ठाकरे सरकारच्या कर्जमुक्ती योजनेची वेबसाईट हॅक; लिंक उघडताच सुरु होतोय ‘हा’ गेम

नाशिक : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंक हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही लिंक उघडल्यानंतर त्यावर कँडीक्रश गेम सुरू होत आहे. किसान पोर्टलवरून शेतकऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये ही लिंक देण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांना किसान पोर्टच्या माध्यमातून हवामान, पावसाचा अंदाज, शासकीय योजना, पिकांवरील रोग, पिकांवरील रोगांवर उपाय, तापमान, व्यवस्थापन आणि सल्ला देण्यासाठी माहिती देण्यात येते. मात्र सध्या या पोर्टलवरून शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भात एसएमएस पाठवण्यात आला होता. परंतु, आता या लिंकवर क्लिक केल्यास प्रसिद्ध कँडीक्रश गेम सुरू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. याबाबत २७ डिसेंबर रोजी राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी केला होता. या कर्जमाफी योजनेनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान कर्ज घेऊन त्याचं पुनर्गठन केलं आहे. ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकित आहे, अशा शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *