परीक्षांचे वेळापत्रक दाेन दिवसांत जाहीर हाेणार

परीक्षांचे वेळापत्रक दाेन दिवसांत जाहीर हाेणार

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न कॉलेजाच्या परीक्षांचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुढील दोन दिवसांत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. याबाबत सर्व कुलगुरूंची बैठक होणार असून, यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर विद्यापीठ कॉलेजांच्या परीक्षादेखील लांबणीवर गेल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने काही दिवसांपूर्वी दोन समित्या तयार केल्या होत्या.

या समित्यांनी आपला अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केल्यानंतर आयोगाची एक विशेष बैठक नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबत अंतिम निर्णय घेत यासंदर्भातील नियमावली केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्रालयाकडे सादर केले.

या अहवालानुसार विद्यापीठ कॉलेजांना आता १ ते ३१ जुलैच्या कालावधीत परीक्षा पूर्ण करावयाच्या आहेत. ही तत्वे पूर्णतः बंधनकारक नसली आणि स्थानिक परिस्थितीस अनुसरून निर्णय घेण्याची मुभा विद्यापीठांना देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्याच्या समितीकडे लक्ष

राज्य सरकारनेदेखील हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. आयोगाच्या अहवालानंतर ही समिती आता परीक्षांबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

युजीसीने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केल्यानंतर या समितीनेदेखील आपल्या कामकाजास सुरुवात केली असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

याबाबत चर्चा करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री बैठक घेणार असून यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे लवकर विद्यार्थ्यांना परीक्षा होणार की नाहीत, झाल्यात तरी त्या ऑनलाइन होणार की ऑफलाइन याबाबतचा उलगडा होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com