नाशिक जिल्हा निश्चितच करोनावर मात करेल : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक जिल्हा निश्चितच करोनावर मात करेल : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक : जिल्ह्यातील नागरिकांसह  पोलिस, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना देखील कोरोना विषाणूने आपल्या विळख्यात घेतल्याने सर्वांचीच चिंता गेले महिनाभर खूपच वाढलेली होती. त्यातच मालेगाव शहराचा वाढता आकडा चिंताजनक रित्या वाढत होता.

गेल्या दीड महिन्यात करोनाग्रस्तांची संख्या ७७८ वर पोहचली होती. मात्र नागरिकांचा प्रतिसाद, सर्व यंत्रणांचा समन्वय आणि नियोजनबध्द उपचार पध्दती या त्रिसूत्रीने आतापर्यंत ५३४ रुग्णांना करोनामुक्त करण्यात यश आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे ५३४ मध्ये मालेगांव शहरातील ४२८ रुग्णांचा समावेश आहे.

तसेच डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा आजाराची लक्षणे जाणवून पुन्हा दवाखान्यात परत आलेले एकही प्रकरण दिसून आलेले नाही. यावरून रुग्णांना योग्य उपचार मिळून ते कोरोना संसर्गातून बाहेर पडलेले आहेत हे स्पष्ट होते. त्यामुळे आपण या आपत्तीवर सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच मात करू असा आशावाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.

श्री. मांढरे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात अतिशय समाधानकारक दिसून येत आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी तसेच इतर सर्वच यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. येत्या काही दिवसात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे.

सध्या जिल्हा रुग्णालयात २५, नाशिक महानगर पालिकेच्या रुग्णालयात ०३, डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेजमधे ७७, मालेगाव येथे ६६ तर नाशिक ग्रामीण मध्ये ३७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.  दुर्दैवाने आत्तापर्यंत जिल्ह्यात ३३ रुग्ण या संसर्गजन्य आजाराने दगावले असल्याचीही माहिती श्री. मांढरे यांनी दिली.

आरोग्य यंत्रणेसाठी सुखावह बाब
गेल्या ८ एप्रिलपासून कोरोना रुग्ण वाढीच्या आलेखामुळे राज्यभरात चिंतेचा विषय ठरलेल्या मालेगावात आता परिस्थितीत बदलत आहे. एकीकडे दररोज येणाऱ्या पॉझिटीव्ह अहवालामध्ये कमालीची घट झाली असून, दुसरीकडे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे.

करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबतच्या नवीन नियमानुसार मालेगावातील तब्बल ६०२ रुग्णांपैकी मालेगांव ४२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसेंदिवस रुग्ण उपचाराना साथ देत असून बरे होण्याचे प्रमाणात वाढ  दिसून येत आहे, असेही श्री मांढरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हवाला देऊन सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com