Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दररोज १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण : पालकमंत्री भुजबळ

Share

नाशिक : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी रेशनच्या माध्यमातून अन्न धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तसेच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत पाच रुपये दराने १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती अन्न पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.३) शहरातील रेशन दुकान व शिवभोजन केंद्रांना भेटी दिल्या. रेशन दुकानावर धान्य वितरण करतांना तसेच शिवभोजन केंद्रावर सोशल डिस्टन्स आणि स्वच्छता पाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहणीसाठी त्यांनी शिवभोजन केंद्रास भेट दिली. तसेच किराणा दुकान, मेडिकल स्टोअर्स आणि महानगरपालिकेच्या अन्नछत्राला भेट देऊन पाहणी केली.

नाशिक शहरात गोरगरीब, बेघर, मजूरवर्ग, तसेच बाहेरून आलेल्या मजुरांसाठी शासनाने महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरात २३ मनपा शाळांमध्ये निवारा केंद्र व अन्नछत्राची सुविधा केंद्र सुरु केली आहे.

या निवारा केंद्रामध्ये एकूण ५७९ लोक दाखल असून छगन भुजबळ यांनी आज नाशिक महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय मनपा शाळा क्र.१ म्हसरूळ येथील केंद्रावर भेट देत तेथील लोकांशी संवाद साधला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!