त्र्यंबकेश्वर : अतिदुर्गम वाड्यापाड्यांतील ३२५ कुटुंबांच्या अंगणात पेटल्या चुली

नाशिक : “होय, तुमची खानदानी प्रवचनं छानच आहेत, तुमचे रेशीमकाठी वादविवाद तेही श्रवणीय,मननीय आणि माननीयही आहेत, तुमच्या पायापाशी बसून मी सारं ऐकेन, खूप काही शिकेनही, पण तूर्त माझ्या सन्मित्रांनो, रजा द्या मला, पलिकडच्या जंगलामध्ये हिमलाटेत कुडकुडणाऱ्या त्या पोरांकडे मला जायचं आहे, त्यांच्या अंगणात जाळ पेटविण्यासाठी… ” कविवर्य ‘कुसुमाग्रज’ यांच्या कवितेतील ओळींची आठवण व्हावी आणि याची देही याची डोळा त्याची अनुभूती लॉकडाऊनच्या कालावधीत त्र्यंबकेश्वरच्या तालुक्यांतील वाड्यापाड्यांमध्ये फिरताना आली.

तृप्ती महिला बहुउद्देशीय संस्था आणि स्त्री सृजन शक्ती बहुउद्देशीय सामाजिक विकास प्रबोधिनी यांच्या मदतीने आदिवासी पाड्यांवर 325 गरजू कुटूंबांना गहू, तांदूळ या धान्याच्या व्यतिरिक्त चहा पावडर, साखर, डाळी, मीठ व इतर काही, मसाले अशा 9 जीवनावश्यक साहित्याचे वाटप केरण्यात आले.

वर्षानुवर्षे शेतमजुरी आणि हात मजुरी करून संसाराचे रहाटगाडगे चालवणारे शेकडो आदिवासी कुटुंबे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम वाड्यापाड्यांत वास्तव्य करतात. काम नसेल तर घरवजा झोपडीतील चार, सहा जीवांचे वीतभर पोट कसे भरावे ह्याचीच सर्वांना भ्रांत. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आल्याचा सर्वाधिक फटका ह्याच कुटुंबांना बसला.

शासनाच्या ताळेबंदीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करताना एकीकडे बुडालेला रोजगार, दुसरीकडे मात्र पोटासाठी अन्नाच्या शोधात विवंचना सुरू होती. अनेक सामाजिक, सेवाभावी संस्था आणि कार्यकर्त्यांकडून गरजू कुटुंबांना रस्त्यालगतच्या आणि शहरांजवळील कुटुंबांना अन्न धान्याचे वाटप झाले.

परंतु वंचित असलेल्या आदिवासी वाड्या-पाड्यात स्वस्त धान्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना, शासनाच्या पुरवठा विभागामार्फत अन्न-धान्य वगळता कुणीही आणि कुठलीही मदत पोहोचलेली नव्हती. अन्नधान्य तर मिळाले परंतु ते शिजवण्यासाठी रोज लागणारा किराणा जसे मिठ, मिरची, मसाले, तेल, चहा, साखर या सारख्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. रोजंदारी बंद असल्याने खिशात पैसे नाही, असलेली छोटी-मोठी दुकाने बंद.

गेल्या आठवड्यापासून कित्येक कुटुंबांची निव्वळ तांदूळ उकडवून जगण्याची धडपड सुरू असल्याने त्यांच्या डोळ्यांतून भीती आणि व्याकुळता स्पष्टपणे दिसत होती. त्या परिसरांत काम करणारे कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी संवेदनशीलता दाखवत ही बाब समाजसेविका व उद्योजक रूपल गुजराथी-वाघ यांच्या कानावर टाकली. दुगारवाडी, उर्मांडे, जांभूळ वाडी, हर्षवाडी, कळमुस्ते, तळेगांव आदी गावांत शेकडो कुटुंबे अन्नासाठी त्रस्त असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘गरिबांना मदत करा’आवाहनामुळे लॉकडाऊनमध्ये विधायक कामाची प्रेरणा रुपल गुजराथी-वाघ यांच्या मनात जागृत झाली. आपल्या तृप्ती महिला बहुउद्देशीय संस्था आणि स्त्री सृजन शक्ती बहुउद्देशीय सामाजिक विकास प्रबोधिनी यांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी पाड्यांवर 325 गरजू कुटूंबांना गहू, तांदूळ या धान्याच्या व्यतिरिक्त चहा पावडर, साखर, डाळी, मीठ व इतर काही, मसाले अशा महिनाभर पुरतील अशा 9 जीवनावश्यक अशा स्वयंपाकाच्या वस्तुंचे वाटप त्यांनी केले. त्यामुळे आज या आदिवासी वाड्यापाड्यांवर प्रत्येकाच्या अंगणात चुल पेटताना दिसतेय.

या उपक्रमात स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर, तृप्ती उद्योग, बी.जी.वाघ फाउंडेशन, स्वयंसेवक प्रणिता देसाई, हार्दिक देसाई, अनुजा देसाई, कल्पेश जाधव, वसईकर सर, अक्षय वाघमारे, संतोष पुणेकर, अभिषाल वाघ यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम सामाजिक अंतर, हात धुणे आदींचे पालन करून प्रबोधनही करण्यात आले.

हे कार्य निरंतर सुरू असणार असल्याचा शब्द या सर्वांनी यावेळी आदिवासी बांधवांना दिला, ‘याची देही याची डोळा, पहावा हा सुखाचा सोहळा’ पाहतांना ‘त्यांच्या अंगणात पेटलेल्या चुली’ तेवत होत्या कोरोनाचा अंधकार भेदण्यासाठी !


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *