राज्यात ६२ लाख ३९ हजार ७३९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप : छगन भुजबळ

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक : राज्यातील ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.१ ते २४ एप्रिल २०२० या कालावधीत राज्यातील १ कोटी ५१ लाख १३ हजार ९९९ शिधापत्रिका धारकांना तब्बल ६२ लाख ३९ हजार ७३९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे २० लाख २ हजार ८९१ क्विंटल गहू, १५ लाख ४६ हजार ७७५ क्विंटल तांदूळ, तर १८ हजार ९५० क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ८ लाख २८ हजार ३८० शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. ३ एप्रिलपासून एकूण १ कोटी १८ लाख १५ हजार ८१६ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ५ कोटी ३८ लाख १ हजार ४५४ लोकसंख्येला २६ लाख ९० हजार ७० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. या योजनेसाठी ३५ लाख ८२० क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *