परप्रांतीय मजूर वाटसरूंचे ‘सांगाती’ : उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे

परप्रांतीय मजूर वाटसरूंचे ‘सांगाती’ : उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे

नाशिक : सगळं सुरळीत सुरू असताना एक साथ येते…आयुष्याची उलथापालथ होते…रोजीरोटी बंद होते…जीव वाचविण्यासाठी, वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी मग सुरू होते पायपीट…ही पायपीट असते आपल्या घराकडे, गावाकडे, प्रांताकडे जाण्यासाठीची…मात्र घराकडे जाणारी ही वाट इतकी काटेरी असते की तरुण, वयोवृद्धांसह कोवळे जीवही रडकुंडीस येतात…तरीही जगण्याची आस या वाटेवर चालायला भाग पाडते…आणि याच वाटेवर पुढे लागतो एक मायेचा थांबा…

थकलेल्या-पिचलेल्या जीवांना या थांब्यावरील वटवृक्षाच्या सावलीत आसरा मिळतो…आणि येथून पुढे सुरू होतो त्यांच्या आयुष्याचा एक अनोखा प्रवास…तो थांबा असतो प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकनगरीचा…आणि अडचणीत सापडलेल्या…रंजल्या-गांजलेल्या वाटेवरील प्रवाशांना धीर देणारे असतात नाशिकचे प्रशासन, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे… गेल्या सहा महिन्यापासून नियुक्तीसाठी प्रतिक्षेत असलेले श्री.मुंडावरे यांनी स्वत:हून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून जबाबदारी मागून घेतली आणि या कोरोनायुध्दात सहकाऱ्यांसह स्वत:ला झोकून दिले.

करोना संसर्गामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीत अडकलेले हजारो परप्रांतीय मजूर पायीच गावाकडे निघाले आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. मजुरांचा हा लोंढा जर एका ठिकाणाहून पायी चालत जर हजारो किलोमीटरचे अंतर गाठायला निघाला तर या लोंढ्यासोबत कोरोनाचेही संक्रमण वाढत जाणार होते.

भारतासारख्या आवाढव्य देशासाठी ते खूप घातक ठरले असते. त्यामुळे या मजुरांना कुठेतरी थांबविणे, कोरोना संक्रमणाची साखळी तोडणे खूप गरजेचे असल्याने नाशिकच्या जिल्हा प्रशासनावर खूप मोठी जबाबदारी येवून ठेवली होती. मुंबईहून निघालेल्या या मजुरांना केवळ थांबविणे, त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था करणे आणि ते देखील सगळीकडे लॉकडाऊन असताना, ही देखील तारेवरची कसरत होती.

मात्र महामार्गावर जावून या मजुरांची समजूत काढून त्यांचे मनपरिवर्तन करण्याची जबाबदारी नितीन मुंडावरे व त्यांच्या सर्व सहकारी यांनी लिलया पेलली. नाशिकच्या प्रशासनाला या मोहिमेत परिसरातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, मनपा प्रशासन यांची वेळोवेळी साथ लाभल्याने हे शिवधनुष्य पेलता आले.

जवळपास दोन हजार परप्रांतीयांना मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी, नाशिक, चांदवड , मालेगांव, मनमाड, सटाणा, पेठ, कळवण, नांदगांव आदी ठिकाणी टप्प्याने थांबविण्यात आले.

तसेच जिल्हाभरात २९ निवारागृहात या मजुरांची सोय करण्यात आली. काही झाले तरी घरी जायचेच अशा मानसिकतेत असलेल्या या मजुरांचे मनपरिवर्तन करण्यातही श्री.मुंडावरे यांनी मोठे कौशल्य वापरले. ‘हमे हमारे घर जाना है’, ‘रोज रोज हम दाल-चावल नही खायेंगे’ अशा शब्दात संताप करणाऱ्या काहींना देखील त्यांनी तितक्याच प्रेमाने तहसिलदार त्यांचे सहकारी व समोपदेशक यांच्या मदतीने समजावले. काहींनी तर जेवणाचे ताट भिरकावून लावले, काहींनी निवरागृहातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, अशा वेळोवेळी समुपदेशकांची मदत घेण्याचा प्रयत्नही मुंडावरे, प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार अर्चना पागिरे, तहसिलदार अनिल दौंडे, नायब तहसिलदार परमेश्वर कासोळे आदी टीमने केला.

प्रशासनाने हे प्रयत्न पाहून मग हळूहळू या मजुरांचा विरोधही मावळत गेला आणि त्यांच्यासाठी निवारागृहात नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी त्यांचे माणुसकीचे नाते जोडले गेले. अनेकांनी त्यांचे पदरचे पैसे खर्च करून त्यांना मदत केली. एका टप्प्यावर या परप्रांतातील आश्रितांचे आणि नाशिकच्या अधिकाऱ्यांचे नाते इतके दृढ झाले की काहींचे वाढदिवसही या शेल्टर्समध्ये साजरे करण्यात आले. सात आठ दिवसातच या निवारागृहातील जनजीवन सुरळीत सुरू झाले. मदतीचा ओघ सुरू झाला.

सोशल डिस्टन्सने दूर ठेवले करोनाला

या शेल्टरमधील एका धक्कादायक प्रसंगाबाबत श्री. मुंडावरे सांगतात, दानशूर येवून या मजुरांना, त्यांच्या मुलांना भाजीपाला, फळे, दूध देवू लागले होते. त्यांची आरोग्य तपासणी सुरू होती. मुलांचे लसीकरणही झाले. मात्र अशातच नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण येथील वसतिगृहातातील एका परप्रांतीयाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्या निवारागृहात एकूण जवळपास ३०० निर्वासित थांबविण्यात होते. प्रशासनाने अशावेळीदेखील मागे न हटता प्रत्येक कक्षाची पाहणी केली. त्याच्या संपर्कातील १२ लोकांचे स्वॅब घेतले मात्र या पाहणीत त्यांच्या असे निर्देशनास आले की, या लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम ठेवल्याने इतर कोणालाही बाधा झाली नाही. त्याच्यासोबत राहणाऱ्यां लोकांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले. नियमांचे कोटेकोर पालन केल्याने मोठ्या संकटापासून बचावलो.

परतीच्या प्रवासाला माणुसकीचा स्पर्श

खाण्यापिण्याची सोय असली तर या मजुरांना किती दिवस थांबवून ठेवणार, असा प्रश्न असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून त्यांना टप्प्याने त्यांच्या प्रांतात सोडण्याचे ठरविण्यात आले. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंडावरे व त्यांचे सहकारी तहसिलदार प्रशांत पाटील, पोलीवार, तुषार सुर्यवंशी व ईतर सर्व सहकारी यांनी सुमारे ४० हजार परप्रांतीय मजूरांना रेल्वे व एस टी महामंडळाच्या बसने त्यांच्या गावी पोहचविण्याचे नियोजन आखले. एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैद व परिवहन विभागाच्या सहकार्य लाभले.

शासनाने परप्रांतीयांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी एकूण ४० लाख रुपयांची मदत दिली होती. रेल्वे, एसटी बसने जवळपास ३० हजार मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचे नियोजन होते.

विशेष म्हणजे या परतीच्या प्रवासात कोणत्याही मजुराकडे तिकिटाचे पैसे घेतले नाही. त्या सगळ्यांना विनामूल्य घरी सोडण्यात आले. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल ४० हजार रुपये जमा करून त्यांना तिकिटे काढून देण्यात आली होती. महाराष्ट्रातून पहिली रेल्वे हि १ मे रोजी भोपाळ येथे व २ मे रोजी लखनौ येथे नाशिक येथुन रवाना झाली.तो पॅटर्न आज राज्यांत राबवला जात आहे.

डोळ्यात तरळले निरोपाचे अश्रू

रेल्वे, बसचे नियोजन झाल्यानंतर प्रत्येक निवारागृहात निरोप धाडले गेले. घराची आस लागलेल्या मजुरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी मोठ्या आनंदाने आवराआवर केली. मात्र नाशिकच्या प्रशासनाच्या अशा अवघड समयी केलेली मदत आणि त्याप्रती असलेला आदर त्यांच्या डोळ्यात अश्रू बनून तरळत होता. अनेकांचा नाशिकमधून पाय निघत नव्हता तर त्यांना निरोप देताना, ओस पडलेल्या निवारागृहाकडे पाहताना श्री. मुंडावरेंसह नाशिकच्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आदींना देखील भरून आले होते.

आयुष्यात खूप लोकांची कामे केली, अनेकांच्या अडचणी सोडविल्या, मात्र कोरोनाकाळात परप्रांतीयांसाठी केलेल्या या कामाचा, त्यातून मिळालेल्या आनंदाचा क्रमांक सदैव अग्रभागी राहील, असे सांगताना उपजिल्हाधिकारी श्री. मुंडावरेंच्या चेहऱ्यावर समाधान झळकले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com