Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाचा आधार

Share

पंचाळे : करोना संसर्गामुळे देशात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. परिणामी व्यवसाय बंद असल्याने ग्रामीण भागात अर्थकारण विस्कळीत झाले आहे. शेतीमालाला बाजारात उठाव मिळत नाही. मात्र, अशा परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय हाच एकमेव आधार ठरला आहे.

करोना नियंत्रणासाठी राज्यात टप्प्या टप्य्याने १७ मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे.

या काळात संचारबंदी असल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. शिवाय उद्योग व्यवसाय बंद असल्याने ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी वर्गासमोर अडचणी वाढणे स्वाभाविक आहे. रब्बीचा हंगाम आश्वासक ठरला असला तरी उत्पादनांना बाजारात मागणी नाही.

कांदा, गहू साठवण्यासाठी जागा नाही, द्राक्ष, भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन उत्पादन खर्च देखील निघाला नाही. परिणामी करोना काळात दुग्धव्यवसाय हाच एकमेव आधार शेतकऱ्यांना आहे. केवळ दुधानेच या परिस्थितीत पंचाळे परिसरातील शेतकऱ्यांना तारले आहे असे म्हणता येईल.

परिसरात दुग्ध व्यवसायाची भरभराट झाली असून पंचाळे येथे दूध व्यवसायाची भरभराट झाली असून दिवसाकाठी शंभर ते दीडशे लिटर दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. गावामध्ये ५ दूध संकलन केंद्र असून त्यामध्ये दररोज १५ ते २० हजार लिटर दूध जमा होते.

लॉक डाऊन च्या अगोदर भाव व्यवस्थित होते. परंतू नंतरच्या काळात हॉटेल व्यवसायिक व दुधापासून उपपदार्थ बनवणाऱ्या व्यावसायिकांकडून मागणी कमी झाल्याने भावांमध्ये घसरण झाली. सरकी पेंड मुरघास मका यांचे भाव जैसे थे असून दुधाच्या लिटरमागे पाच ते सात रुपयाची मात्र घट झाली आहे.

परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात २५ टक्के पर्यंत घट झाली आहे. असे असले तरी ऐन अडचणीच्या काळात हाच एकमेव व्यवसाय शेतकऱ्यांसाठी आधार ठरला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!