करोनाचा शहर बससेवेला फटका; शहरातील फेर्‍या घटविल्या

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । करोना विषाणूंचा धोका वाढत चालल्याने एसटी महामंंडळाने शहरातील शाळा आणि महाविद्यालयीन मार्गावरील बसफेर्‍या मोठ्या संख्येने घटविल्या आहेत. त्याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होणार असून प्रवाशी संख्याही रोडावली आहे. आधीपासूनच शहर बससेवा तोट्यात असताना करोनामुळे पुन्हा एसटीला आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

शासनाने येत्या 31 मार्चपर्यंत सर्व शाळांना सुटी व वर्क टू होमची सुविधा दिल्याने शिक्षण तसेच व्यापार, व्यवसाय आणि विविध कारणांनी शहरात राहाणार्‍यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळेच दोन दिवस रोडावलेली प्रवाशी संख्या काहीअंशी वाढल्याचे बसस्थानकांवर दिसत आहे. दरवर्षी या महिन्यात विविध वर्गांच्या परीक्षा असल्याने ट्रॅव्हल्सला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. हा ‘स्लॅक सीझन’ असतो. मात्र, शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केल्याने प्रवासी संख्या वाढली आहे. मागील दोन दिवसांत ही संख्या वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे.

करोनाचा गर्दीच्या ठिकाणी प्रसार होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळेच त्याचा प्रसार होऊ नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, शक्यतो प्रवास करू नये, सभा-यात्रांचे आयोजन करू नये, पर्यटनाचे कार्यक्रम रद्द करावेत, अशा विविध सूचना राज्य सरकारने एसटीला दिलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बसस्थानकावरील गर्दी आणि प्रवाशांच्या संख्येत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार दैनंदिन वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना एसटी महामंडळातर्फे देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नाशिक-पुणे मार्गावरील प्रवासी संख्या घटली असून सध्या एसटीच्या नाशिक विभागाकडून या मार्गावरील शिवनेरीतील प्रवाशांसाठी हॅण्ड सॅनिेटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच करोनाच्या प्रतिबंधासाठी एसटी महामंडळ चालक, वाहक व सेवकांंना मास्क देणार आहेत, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली.

जादा वाहतूक बंद
करोनामुळे वणी येथील सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव यंदा रद्द करण्यात आल्याने एसटी महामंडळानेदेखील येथील जादा बस वाहतुकीचे नियोजन रद्द केले आहे. तसेच विविध ठिकाणच्या यात्रा, पर्यटन सहलींचे नियोजनही थांबविले आहे. तसेच शाळांना सुटीच दिल्याने शहरातील शालेय व महाविद्यालयीन बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात जेथे शाळा सुरू आहेत, तेथील बसफेर्‍या सुरू असून दहावीची परीक्षा सुरू असल्याने आवश्यक त्या बसफेर्‍या सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

एसटीकडून उपाययोजना
*गर्दीच्या बसस्थानकावरील बैठक व्यवस्था दररोज दिवसातून दोन-तीन वेळी सॅनिटायझरचा वापर करून स्वच्छ केली जावी.
*बसस्थानकाचा परिसर जंतूनाशकांची फवारणी करून निर्जंतुक केला जावा.
*वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना सॅनिटरी लिक्विड एक बाटली देण्यात यावी. प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांनी ती उपलब्ध करावी.
*आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस सॅनिटरी लिक्विड मिश्रित पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी.
*बसस्थानकावरील उद्घोषणा यंत्रणेद्वारे वेळोवेळी करोना विषाणूंच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *