राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये कोरोना टेस्टींग लॅब !

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक : कोराेनामुळे उदभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी परिक्षा सामायिक पध्दतीने घेण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला. विद्यापीठांनी आपल्या आकस्मिक निधीचा वापर कोरोना परिक्षण प्रयोगशाळा सुरु करणे, मास्क व सेनिटायझर निर्मिती तसेच इतर समाजोपयोगी साहित्य तयार करण्यासाठी करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

व्हर्च्युअल क्लास रुम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाईन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य सुरु ठेवावे, प्रत्येक विद्यापीठाने आपल्या परिसरामध्ये स्थलांतरित कामगार, बेघर व निराश्रीत लोकांना भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

विद्यापीठांच्या कुलगुरुंनी आपल्या वेतनाचा काही भाग शासनाला योगदान म्हणून देता येईल का याचा विचार करावा, राज्यातील विद्यापीठांच्या परिक्षा सामायिकपणे घेता येतील का याचा अभ्यास करुन शासनाला अहवाल सादर करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठांच्या कुलगुरुंची समिती गठीत केली असून समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी राज्यपालांना दिली.

विद्यापीठांमध्ये कोरोना टेस्टींग लॅब सुरु करण्याबाबत तसेच कमी किमतीचे व्हेटींलेटर निर्माण करण्याबाबत विद्यापीठांच्या प्रयत्नांना शासन सर्वतोपरी मदत करेल असे त्यांनी या बैठकीत सांगितले.

सहभागी कुलगुरूंनी विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रशिक्षित स्वयंसेवक मदतकार्यात देत असलेले योगदान, तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी करीत असलेले प्रयत्न तसेच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *