Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड : कोरोना वॉरियर्सला महावितरणच्या प्रकाशदूतांचा ‘बॅकअप’

Share

नाशिकरोड । का.प्र.
पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या काळात वैद्यकीय सेवा, पोलिस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आदि सरकारी आस्थापना जीवतोड मेहनत करत आहेत. या आस्थापनांना मजबूत ‘बॅकअप’ देण्याचे महत्त्वपूर्ण व तेवढेच दखलपात्र कार्य महावितरणकडून केले जात आहे.

लॉकडाऊनमुळे विजेच्या मागणीत कमालीची घट झाली असली तरी तांत्रिक बाबींवर मात करून अविरत व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कसोशीने प्रयत्न करताहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण राज्यात विजेच्या मागणीवर परिणाम झाला असून वीज मागणीचा आलेख बराच खालावला आहे. राज्यातील महानिर्मितीच्या सातपैकी चार केंद्रातील वीज निर्मिती बंद करण्यात आली असून त्यात नाशिकच्या वीज निर्मिती केंद्राचा समावेश आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात राज्यात 21 ते 22 हजार मेगावॅट विजेची असलेली मागणी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सहा ते सात हजार मेगावॅटने खालावल्याचे दिसून येते.

राज्यात सोमवारी (दि. ६) १५ हजार मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेल्याने वीज मागणीचा आलेख किती खालावलाय हे अधोरेखित होते. संपूर्ण औद्योगिक क्षेत्र, हॉटेल्स, दुकाने, खाजगी कार्यालय आदि व्यावसायिक वीज वापराचे ठिकाणे बंद असल्याने विजेची मागणी कमी झाली आहे.

नाशिक परिमंडळाचा विचार करता दरवर्षी उन्हाळ्यात दररोज किमान सतराशे मेगावॅट विजेची मागणी असते. तथापि सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ही मागणी तीस टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी देशदूतला दिली.

याशिवाय नाशिक परिमंडळात प्रिव्हेंटिव्ह मेन्टेनन्स व ब्रेकडाऊनचे काही कामे सुरू आहेत. यात काही भागात दोन ते तीन तासांचे तात्पुरते ब्रेकडाऊनच्या कामांचा समावेश आहे. नॅशनल पॉवर ग्रिड असल्याने अंबाझरी व कळवा येथून संयंत्रण केले जाते. तसेच थर्मल पॉवर स्टेशन कमी केले होते. हायड्रो व गॅस रिझर्व ठेवले. याशिवाय तांत्रिक कॅपॅसिटर बँका बंद ठेवून आवश्यक खबरदारी घेतली असल्याचे जनवीर यांनी सांगितले.

लॉकडाऊन घोषित झाल्यापासून राज्यात पुरवठा होत असलेल्या विजेची मागणी घटली आहे. कारण शेकडो कंपन्या आणि सरकारी आस्थापना बंद आहेत. तर दुसरीकडे या सर्व कार्यालयातील लाखो कर्मचारी, कामगार, नागरिक घरी आहेत. त्यामुळे घरगुती विजेचा वापर मोठ्या प्रमाणत वाढलाय. अशी परिस्थिती निर्माण होईल याची जाणीव ठेऊन महावितरणने कुठंही वीज खंडित होऊ नये यासाठी आधीपासून दक्षता घेत संपूर्ण राज्यात आपले ४० हजार प्रकाशदूत तैनात केले आहेत.

विजेच्या गतीने काम करणाऱ्या या सर्व प्रकाशदूतांच्या सेवेमुळे हे घडत आहे. अति अत्यावश्यक असलेली ही सेवा पुरविणाऱ्या व घरातील बंदिस्त जीवन सुसह्य करणाऱ्या महावितरणच्या तमाम प्रकाशदूतांना ‘देशदूत’चा सलाम!

महावितरणचे सर्व कर्मचारी इमर्जन्सी सेवेत असून सुरळीत वीज पुरवठा होणेसाठी कसोशीने मेहनत घेत आहेत. सद्यस्थितीतील लॉकडाऊनमुळे वसुलीचे प्रमाण अत्यल्प असून दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये वसुलीत 30 ते 40 टक्के घट आली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरून सहकार्य करावे.
-ब्रिजपालसिंह जनवीर
मुख्य अभियंता, महावितरण, नाशिक

लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या टीव्हीवर संपूर्ण जगाची माहिती मिळते. शहरी भागातील नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला गेला तो केवळ महावितरणच्या भरवश्यावर. बेभरवशाची सेवा देणारी संस्था म्हणून हिणवली जाणारी महावितरणची हिच सेवा सध्याच्या कठीण काळात अधिक भरोसेमंद बनली हे मात्र नक्की.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!