Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ग्रामसेवक व पोलीस पाटलांच्या माध्यमातून स्थलांतरीत मजुरांची माहिती संकलित करणार : जिल्हाधिकारी

Share
ग्रामसेवक व पोलीस पाटलांच्या माध्यमातून स्थलांतरीत मजुरांची माहिती संकलित करणार : जिल्हाधिकारी Latest News Nashik Collecting Information of Migrant Laborers through Village Volunteers

नाशिक । राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर वर्गाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली आहे. त्यामुळे सर्व मजूर वर्ग स्वगृही जाण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक व पोलीसपाटील यांना परजिल्हा व परराज्यातून येणाऱ्या स्थलांतरित मजूरांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले, असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.

वाढता जनसहभाग
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बेघर व गरीब लोकांच्या दैनंदिन उजिवीकेचा व उपासमारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी गुगल शीटद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. आजअखेर 103 संस्थांनी यात आपला सकारात्मक सहभाग नोंदवला आहे.

क्वारंटाइन व्यवस्थापन
जिल्हयातील १४ नगरपालिका क्षेत्रांमध्ये एकुण ५७ ठिकाणी क्वारंटाइनची सोय करण्यात आली आहे. त्यात ५ हजार १८ व्यक्तींच्या निवासाची क्षमता आहे. तसेच ग्रामीण भागातील संभाव्य कोरोना बाधीत रुग्णांसाठी १५ तालुक्यात २२ निवासी शाळा व वसतीगृहांमध्ये ४ हजार २६३ खाटांचे नियोजन करण्यात आले.

चेक पोस्ट व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
जिल्ह्यात २९ ठिकाणी चेकपोस्ट कार्यरत असुन १९ हजार ९३७ वाहनांमधील ५१ हजार ८६५ प्रवाशांची तपासणी आजअखेर पर्यंत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात कलम १४४ च्या उल्लंघनाची एकुण ७२९ प्रकरणे घडलेली असून त्यात ७१ व्यक्तींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली अाहे.

नाशिकमध्ये ५०६ टेम्पो भाजीपाला, ५७ टेम्पो फळे, चांदवडमध्ये २१ टेम्पो भाजीपाला, नांदगांवमध्ये २० टेम्पो भाजीपाला, मनमाडमध्ये ४८ टेम्पो भाजीपाल, दिंडोरीमध्ये २ टेम्पो अन्नधान्य असे ५९५ टेम्पो भाजीपाला, ५७ टेम्पो फळे व २ टेम्पो अन्नधान्यांची आवक बाजार समित्यांमध्ये झाली आहे.

१३२ दुकानांची झाली तपासणी
भाववाढ व साठेबाजी करणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई जिल्हा प्रशासनमार्फत सुरू असून आज (३० मार्च २०२० रोजी) २० होलसेल दुकानदार, ४९ किरकोळ दुकानदार व ६३ किराणा दुकानदार अशा १३२ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. निफाड व मालेगाव येथे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने पोलिसांकडून दुकाने बंद करण्यात आली आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!