#Civicsense : ‘सामाजिक भान’ जपण्यासाठी सुसंवाद महत्वाचा

#Civicsense : ‘सामाजिक भान’ जपण्यासाठी सुसंवाद महत्वाचा

नाशिक # गोकुळ पवार : दैनंदिन जीवन जगताना, समाजात वावरतांना, आपली कामे करताना अनेकदा इतरांशी संबंध येतो. अशावेळी आपल्या किंवा इतरांच्या भावना दुखावणार नाहीत यासाठी अनेक गोष्टीचे भान ठेऊन आपले वर्तन असावं लागते. पण काहीवेळा वेळा याउलट अनुभव येतो, अन सामाजिक भान हरवल्याची जाणीव होते.

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे म्हटले जाते. म्हणजेच कुटुंब, समाज, गाव, शहर अशा ठिकाणी अनेक माणसांशी स्नेह असतो. त्यामाध्यमातून अनेक माणसाचे स्वभाव माहित होत असतात. हे सर्व असतांना अनेकवेळा बाजारात, रस्त्यावर, बसमध्ये छोट्यामोठ्या घटना घडतात. म्हणजेच एखाद्याला धक्का लागणे, रस्त्यावर थुंकणे, मोठ्याने आवाजात बोलणे. अशावेळी अनेकदा वादविवाद होतात. तर काहीवेळा सहजपणे ‘सॉरी’ हा शब्द काहींच्या तोंडातून बाहेर पडतो. पण काहीवेळा असे होऊनही समोरची व्यक्ती आपली काहीही चूक नसल्याचा आव आणत आपल्यावरच कुरघोडी करीत असते. अशावेळी सामाजिक भान अशा व्यक्ती विसरत असतात. या घटनांचा समाजावर वाईट परिणाम होतो.

दरम्यान आयुष्यात व्यक्तीला सामाजिक भान असणे महत्वाचे असते. यातून व्यक्तीचा स्वभाव, संस्कार दिसून येतात. तसेच त्या व्यक्तीची एक ओळख समाजात तयार होत असते. यासाठी संवाद महत्वाची भूमिका बजावतो. कारण संवादातूनच माणसाची ओळख होत असते. त्यामुळे एकमेकांमध्ये सुसंवाद आवश्यक असतात. दुसऱ्याशी संवाद साधतांना आपण कसं बोलतो त्यावरून आपली वागण्या बोलण्यातली प्रतिमा समोरचे लोक ठरवतात. थोडक्यात सांगायचं तर जसं लोकांशी आपण बोलतो तसे आपले संस्कार आहेत असं लोक समजतात. हे चांगले शिष्टाचार लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा एकूणच समाजात वावरताना आपण सामाजिक भान जपणे आवश्यक असते.

समाजात गैरवर्तन करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असून अशा व्यक्तींना योग्य ती समज देणे आवश्यक असते. आपल्या वैयक्तिक पातळीवर त्यांच्याशी संवाद साधून सामाजिक भान असण्याची जाणीव करून देणे महत्वाचे ठरते. तसेच कायद्याची मदत घेऊन या व्यक्तींना धडा शिकवू शकतो.
-कल्पेश सोनवणे, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट

समाजात लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असून त्यासाठी पुन्हा पुन्हा संस्काराच्या, वर्तनाच्या गोष्टी बिंबवणे गरजेचे असते. अनेकदा लोक चुका होऊनही सॉरी न बोलता निघून जातात. अशा माणसांना योग्य तो नियम लावला पाहिजे. काहीजण सरळ सॉरी म्हणून मोकळे होतात. पण बदलायचे, चुक सुधारण्याचे नाव घेत नाहीत.
-कमलेश पिंगळे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com