Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड : उगीच रस्त्यावर फिरू नका, कोरोनाला घरात नेऊ नका; पोलिसांचे नागरिकांना खडे बोल

Share

नाशिकरोड । का.प्र.
दादा, ताई, काका, मामा, मावशी आम्ही तुमचीच काळजी करतोय, विनाकारण घरा बाहेर पडू नका, संयम ठेवा, प्रशासनाला सहकार्य करा, ओ काका… एवढ्या आरामात फिरू नका, अहो ताई… तोंडाला मास्क लावा. लॉकडाऊनचे महत्व जाणा, ए दादा… भाजीच्या नावाखाली उगीच रस्त्यावर फिरू नको आणि फुकटचा कोरोना घेऊन घरी जाऊ नको.

तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत, तुम्ही फक्त घरात बसा. काय भाऊ… दररोज यावेळी घरा बाहेर पडतोस… जीवाची काळजी नाही का? अशाप्रकारे पोलिसांनी ध्वनी क्षेपकावर जाहीरपणे सुनावलेले खडे बोल रस्त्यावर फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांना खजील करून गेले.

या अनोख्या पोलिसी खाक्याची मात्रा चांगलीच लागू पडली आणि अवघ्या काही मिनिटात नागरिकांची गर्दी आटोक्यात आली.

जेलरोडच्या नारायणबापू नगर चौकात सायंकाळी पोलिसांनी ध्वनी क्षेपकावर केलेल्या आवाहनामुळे बेशिस्त नागरिकांच्या मुसक्याच आवळल्या गेल्याचे दिसून आले. जेलरोड मधील सर्वात मोठा चौक म्हणून नारायण बापू नगरकडे बघितले जाते.

या भागात भाजी बाजार, मेडिकल दुकाने, खाजगी दवाखाने, दाट लोकवस्ती असून या ठिकाणाहून सतत वर्दळ सुरू असते. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे दिवसभर शुकशुकाट असला तरी सायंकाळी भाजी आणि किराणाच्या नावाखाली काही बेशिस्त नागरिक बिनधास्त पणे रस्त्यावर फिरताना दिसतात.

यात वृद्धांची संख्या जास्तच असते. म्हणूनच ‘शहाण्याला शब्दाचा मार’ या उक्तीप्रमाणे कृती करत काल पोलिसांनी थेट ध्वनी क्षेपकावर अशा नागरिकांना खडे बोल सुनावले. संचारबंदीच्या शांत वातावरणात पोलिसांनी सूनावलेले बोल बेशिस्त नागरिकांना चांगलेच झोंबले.

या आवाजाने काहीजण लांबूनच माघारी फिरले तर पाय मोकळे करण्याच्या उद्देशाने हातात रिकाम्या पिशव्या घेऊन फिरणाऱ्या महिलांनीसुद्धा खाली मान घालून घरचा रस्ता धरल्याचे दिसून आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!