Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

एप्रिलपासून जनगणनेच्या कामाला सुरुवात; अशी असेल प्रश्नावली

Share
एप्रिलपासून जनगणनेच्या कामाला सुरुवात; अशी असेल प्रश्नावली Latest News Nashik Census Work will Began in April 2020

नाशिक । देशात 2021 च्या जनगणनेच्या कामाला येत्या 1 एप्रिलपासून सुरुवात केली जाणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार असून घर यादी व गृहगणनेच्या सराव काळात प्रत्येक कुटुंबाची माहिती तीस प्रश्नांच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार आहे.

दर दहा वर्षांनी देशात जनगणना करण्यात येते. त्यानुसार 2021 च्या जनगणनेची तयारी पूर्ण झाली आहे. दि.1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरदरम्यानच्या काळात जनगणनेच्या कामासाठी नियुक्त सेवक प्रत्यक्ष घरोघर जाऊन माहिती विचारणार आहेत. यात कुटुंबाच्या प्रमुखांचा मोबाईल नंबर, शौचालय, टीव्ही, इंटरनेट, वाहने, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत इत्यादींशी संबंधित माहिती प्रश्नावलीच्या आधारे संकलित केली जाणार आहे. जनगणना आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार दि. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधित सुरू असलेल्या घर यादी व गृहगणनेच्या सराव काळात प्रत्येक कुटुंबाची माहिती घेण्यासाठी जनगणना अधिकार्‍यांना तीस प्रश्न विचारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक केवळ जनगणनेच्या उद्देशाने विचारला जाईल आणि तो इतर कोणत्याही हेतूसाठी वापरला जाणार नाही. जनगणनादरम्यान बँक खात्यांची माहिती मागवली जाणार नाही, असे या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. या खेपेला पारंपरिक पेन व कागदाऐवजी मोबाईल फोन अ‍ॅप्लिकेशनद्वारे जनगणना करण्यात येणार आहे.

जनगणना कामासोबतच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर)चे कामदेखील सुरूच राहणार असून सप्टेंबर 2020 पर्यंत हे काम मार्गी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अधिसूचनेनुसार जनगणना संदर्भ तारीख 1 मार्च 2021 असेल. परंतु जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसाठी ही तारीख 1 ऑक्टोबर 2020 असणार आहे.

अशी असेल प्रश्नावली
इमारत क्रमांक (नगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरण क्रमांक), जनगणना हाऊस क्रमांक, घर क्रमांक, घरात राहणार्‍या सदस्यांची संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, कुटुंबप्रमुखाचे लिंग, घराचे प्रमुख अनुसूचित जाती / जमाती किंवा इतर समुदायाचे आहेत काय?, घराची स्थिती, घर कोणत्या उद्देशाने वापरले जात आहे. छप्पर, भिंत आणि कमाल मर्यादामध्ये वापरली जाणारी सामग्री, घरातील खोल्या, घरात किती विवाहित जोडपी राहतात, शौचालय आहे की नाही, कोणत्या प्रकारची शौचालये आहेत?, स्वयंपाकघर आहे की नाही? यात एलपीजी/ पीएनजी कनेक्शन आहे की नाही, स्वयंपाकघरात वापरले जाणारे इंधन, घराचा मालकी स्तर, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत, घरात पाणी स्त्रोताची उपलब्धता, विजेचा मुख्य स्रोत, ड्रेनेज सिस्टिम, रेडिओ / ट्रान्झिस्टर, दूरदर्शन / इंटरनेट सुविधा आहे की नाही, लॅपटॉप / संगणक आहे किंवा नाही, टेलिफोन / मोबाईल फोन / स्मार्टफोन वापरता की नाही, मोबाईल नंबर, सायकल / स्कूटर / मोटरसायकल / मोपेड / कार / जीप / व्हॅन, घरात कोणते धान्य मुख्यतः वापरले जाते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!