सिन्नर येथील कामगारांना जालन्यापर्यंत जाण्यासाठी ‘संजीवनी फाउंडेशन’कडून बसची सोय

सिन्नर येथील कामगारांना जालन्यापर्यंत जाण्यासाठी ‘संजीवनी फाउंडेशन’कडून बसची सोय

सिन्नर : अजित देसाई

लॉकडाऊनच्या काळात कारखाने बंद असल्याने लाखो कामगारांवर बेरोजगारीची संक्रांत ओढवली आहे. त्यामुळे उपासमार होण्यापेक्षा गावाकडे गेले बरे अशी या कामगारांची धारणा असून जाण्याची सोय होत नसल्याने ते कामगार चक्क पायपीट करत परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी माळेगाव एमआयडीसी येथून थेट चंद्रपूर सातशे किलोमीटरच्या पायी प्रवासाला निघालेल्या ५५ कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची ही खडतर वाट कोपरगाव येथील ‘संजीवनी फाऊंडेशन’ ने सुकर केली. फाउंडेशनचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी वावी येथून स्वतःच्या बसने या कामगारांची जालन्यापर्यंत जाण्याची व प्रवासात जेवणाची व्यवस्था केली.

करोना संसर्गामुळे देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पुढचे चार सहा महिने परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याच्या भीतीने रोजगारापोटी स्थलांतरित झालेल्या राज्यातील व राज्याबाहेरील असंख्य कामगारांनी आपल्या कुटुंब कबिल्यासह गावाची वाट धरली आहे.

मिळेल त्या वाहनाने, साधनाने मार्गक्रमण करणाऱ्या या कामगारांना रणरणत्या उन्हात पायपीट करण्याची वेळ नियतीने आणली आहे. वास्तव्याच्या ठिकाणी थांबून उपासमार होण्यापेक्षा गावाला गेलेले बरे असे ठरवत कामगारांचे असंख्य गट सर्वच राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर मार्गक्रमण करताना दिसतात.

तालुक्यातील माळेगाव येथील शासकीय औद्योगिक वसाहतीत कारखान्यात कामाला असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांवर देखील रोजगार ठप्प झाल्यामुळे अशीच पायपीट करण्याची वेळ आली. गावाकडे जाण्यासाठी वाहने मिळत नसल्याने त्यांनी बायका-मुलांसह गावाचा रस्ता धरला. दोन दिवसांपूर्वीसायंकाळी हे कामगार वावी येथे आल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्यांना थांबवत राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत बस सेवेबद्दल माहिती दिली.

सिन्नरच्या आगार प्रमुखांनी देखील दुसऱ्या दिवशी या कामगारांसाठी मोफत व सोडता येईल असे सांगितले. मात्र, रात्रीतून एसटीने निर्णय बदलला आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी मोफत बस सोडण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे या कामगारांच्या पुढच्या प्रवासाचे करायचे काय असा प्रश्न वावी गावातील तरुणांसमोर होता.

या परिस्थितीत पाथरेचे माजी सरपंच मच्छिंद्र चिने यांच्या माध्यमातून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मदत झाली. संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून विश्वस्त सुमित कोल्हे यांनी स्वतःच्या बसने या कामगारांना जालन्यापर्यंत जाण्याची सोय उपलब्ध करून दिली.

कोल्हे यांनी स्वतः वावी येथे येत या प्रवाशांची इन्फरेड थर्मामीटर स्कॅनर द्वारे तपासणी केली. प्रत्येकाचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करून त्यांना बसमध्ये बसवले. प्रत्येक कामगाराला पाण्याची बाटली आणि नाश्त्याचे पाकीट दिले. त्यानंतर ही बस वैजापूर पर्यंत रवाना करण्यात आली.

वैजापूर येथून गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी औरंगाबादपर्यंत जाण्यासाठी या कामगारांना बस उपलब्ध करून दिली व तेथून पुढे जालन्यापर्यंतचा प्रवास औरंगाबादचे प्रसिद्ध उद्योजक संचेती ग्रुप कडून पार पडला. याच दरम्यान भाजप नेते व माजीमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संपर्कातून नागपूरपर्यंत या कामगारांना दिलासा मिळाला. त्यामुळे माळेगाव येथून निघालेल्या या प्रवाशांची मोठी पायपीट टळण्यास मदत झाली.

ट्रस्ट कडून सहा बस तैनात

गेल्या दहा दिवसात कोपरगाव तालुक्यात पायपीट करत येणाऱ्या हजारो कामगारांना जिल्ह्याच्या सरहद्दीवर पोहोचवण्यात आले आहे. संजीवनी फाऊंडेशनने सहा बस याकामी उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक फेरीनंतर ही बस कारखाना कार्यस्थळावर नेऊन सॅनिटायझरने आतून-बाहेरून स्वच्छ केली जाते.

विदर्भ मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ अधिक असल्याने गंगापूरचे आमदार प्रशांत बंब व संचेती बिल्डर्सची या उपक्रमात मोठी मदत झाली आहे. नागपूरपर्यंत अशा प्रकारे मदत करणाऱ्यांची साखळी तयार झाली असून उन्हातानात मुलाबाळांसह पायपीट करणाऱ्या लोकांना या माध्यमातून मोठा आधार मिळाला आहे. आमच्या वाहनात प्रवेश करताना प्रवाशाचे तापमान तपासले जाते. ट्रस्टच्या माध्यमातून कोपरगाव येथे आवश्यक औषधोपचार देखील करण्यात येतो. याशिवाय प्रत्येकाच्या नाष्टा व जेवणाची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली आहे.
– सुमित कोल्हे, विश्वस्त संजीवनी फाउंडेशन

सिन्नरकडून येणाऱ्यांना मोठा दिलासा

चाळीस अंशापर्यंतच्या तापमानात मुलेबाळे घेवून असंख्य मजूर शिर्डी महामार्गावरून मार्गक्रमण करीत आहेत. सरकारच्या निर्बंधामुळे खाजगी वाहनचालक इच्छा असून देखील अशा लोकांना मदत करत नाही. अशा परिस्थितीत कोपरगाव तालुक्यात कुणी पायी चालू नये यासाठी संजीवनी फाउंडेशनचे योगदान न विसरता येणारे आहे. गावाची ओढ लागलेल्या या वाटसरुंसाठी कोल्हे कुटुंबीय देवदूतासमान आहे. सिन्नरकडून पायी येणाऱ्या शेकडो कामगार व त्यांच्या कुटुंबांना या उपक्रमातून इच्छित स्थळी जाण्यासाठी मोठा दिलासा मिळतो आहे.
– मच्छीन्द्र चिने, माजी सरपंच पाथरे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com