Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर : पाथरे येथील दोन्ही रुग्णांची करोनावर मात; दोघांनाही डिस्चार्ज

सिन्नर : पाथरे येथील दोन्ही रुग्णांची करोनावर मात; दोघांनाही डिस्चार्ज

पाथरे : आरोग्य विभागाकडून केलेले उपचार आणि इच्छाशक्तीच्या बळावर तालुक्यातील वारेगाव (पाथरे) येथील ६५ वर्षीय वृद्ध आणि ४० वर्षीय युवक या बापलेकांनी करोनासारख्या दुर्धर आजारावर मात केली आहे.

रविवारी (दि.१०) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांचे वारेगावात आगमन झाल्यानंतर आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

तालुक्यातील पहिले दोन्ही रुग्ण करोनामुक्त होवून घरी परतल्याने आरोग्य विभागासह तालुकावासियांनी समाधान व्यक्त केले आहे.

वारेगावातील दोघे बापलेक लागोपाठ १३ आणि १९ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. या दोघांचेही महिनाभराच्या उपचारानंतर लागोपाठचे दोन अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर रविवारी त्यांना डॉ. जाकिर हुसेन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोहन बच्छाव यांनी सांगितले.

महिनाभराच्या उपचारानंतर हे बापलेक घरी परतल्यानंतर कुटुंबियांसह पाथरे खुर्द बुद्रुक वारेगाव व कोळगाव माळच्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. करोना मुक्त झाल्याने या दोघांनी आरोग्य विभागासह गावकऱ्यांचे आभार मानले.

सायंकाळी चार च्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेमधून वारेगाव येथे दोघांचे आगमन झाले. हे दोघेही गाडीतून उतरताच वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश भालेराव, सरपंच मीननाथ माळी, आरोग्यसेविका कमल मुनतोंडे, सपना सोमवंशी, जयश्री पडवळ, बेबी चीने, गायत्री नाईकवाडे, माजी सरपंच मच्छिंद्र चिने, किशोर सोमवंशी, हवालदार मोरे आदींनी सोशल डिस्टन्स राखत टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. ग्रामस्थांच्या स्वागताने बापलेक भारावून गेले.

दरम्यान, पुढील १४ दिवस त्या दोघांनाही होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारे त्रास जाणवल्यास आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कुटूंबाला अन्नधान्यासह इतर कुठलीही अडचण भासल्यास ग्रामपंचायतच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच मीनानाथ माळी यांनी यावेळी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या