मार्च महिन्यात बँकांचे कामकाज आठ दिवस बंद; जाणून घ्या कारण

मार्च महिन्यात बँकांचे कामकाज आठ दिवस बंद; जाणून घ्या कारण

नाशिक : वित्तीय वर्षाचा अखेरचा महिना म्हणून मार्च महिना सर्वांसाठीच धावपळीचा असतो. या महिण्यात बँकांचे हिशोब, वार्षिक ताळेबंदाची गडबड सुरु असते. मात्र या लगीनघाईच्या पार्श्वभूमीवर येत्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील सरकारी बँकांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे. होळीची सुट्टी, बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप आणि शनिवार-रविवारची जोडून येणारी सुट्टी यामुळे दि.8 ते 15 मार्च दरम्यान सलग आठ दिवस बँका बंद राहणार असून, परिणामी सर्वच वर्गातील ग्राहकांची तारांबळ उडणार आहे.

मार्च महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात आठ मार्चला रविवारची सुट्टी, सोमवारी (दि.९) होळी, १० तारखेला धुलीवंदन, दि.११ ते १५ मार्च दरम्यान देशातील सर्वच सरकारी बँकांचे अधिकारी व कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संपावर जाणार आहेत. तर १४ तारखेला दुसरा शनिवार आणि १५ तारखेला पुन्हा रविवार असल्याने सलग आठ दिवस बँकांना सुट्टी राहणार असल्याची शक्यता आहे.

त्यामुळे ग्राहकांना चेक वटवण्यापासून ते रोखीने व्यवहार करण्यापर्यंत अनेक आडचणींचा सामना करावा लागणार आहे. सरकारने घोषित सुट्ट्यांव्यतिरिक्त तीन दिवस संपामुळे बँका बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी उद्या दि. २८ देशातील १० प्रमुख अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या सुकाणू समितीच्या सरकार सोबतच्या बैठकीत या बाबत तोडगा निघू शकतो असे वृत्त आहे. संपामुळे बॅंका आठ दिवस बंद राहिल्यास लघु उद्योजक, व्यापारी, रोजंदारी करणाऱ्या ग्राहकांना देखील व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागणार आहे

खर्चाचा अंदाज घेऊन करा नियोजन

अलीकडे बहुतेक ठिकाणी पेटीएम, स्वाईप मशीन, ऑनलाइन पेमेंट, नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्डच्या सहाय्याने पैशांचे व्यवहार केले जातात. डिजिटल पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी देखील ग्राहकांना बँकेतून रक्कम काढण्याला मर्यादा घातल्या आहेत. ऑनलाइन व्यवहारांवर भर देण्यात येत असला तरी असंख्य छोटे दुकानदार, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार यांच्यासोबत रोखीनेच व्यवहार करावे लागतात. अशा खिशात सुट्टे पैसे असणे आवश्यक असते. बँका आठ बंद राहणार असल्याने रोखीने करण्यात येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजन करावे. त्यासाठी मार्च च्या पहिल्या आठवड्यातच खर्चासाठी पुरेशी रक्कम बँकेतून काढून ठेवावी असा सल्ला ग्राहकांना देण्यात येत आहे.

.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com