दुगारवाडी धबधब्यात औरंगाबाद येथील युवतीचा मृत्यू; दोघांचा शोध सुरु

दुगारवाडी धबधब्यात औरंगाबाद येथील युवतीचा मृत्यू; दोघांचा शोध सुरु

नाशिक :औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयात शिकणारे मूळचे तेलंगणा राज्यातील सहा विद्यार्थी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी आले असता, त्यातील एक तरुणी धबधब्यात बुडून तिचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे बेपत्ता झाले असून त्यांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे.

अनुषा(21, रा. तेलंगणा) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे, तर रघुवंशी (21, रा. तेलंगणा) व कोटी रेड्डी (20 रा. तेलंगणा) हे दोघे बेपत्ता आहेत. (दि.16) औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयांत शिक्षण घेणारे गिरीधर आकाश (वय-20), व्यंकटेश्वर रेड्डी (20),अनुषा,(21) रघुवंशी (21) कोटी रेड्डी(20),पाचही रा. तेलंगणा ) व काव्या एल (20) रा. हैदराबाद हे सर्व नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी आले होते.

दि.17 रोजी दुपारी साडेचार वाजता दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी पोहचले. त्यापैकी गिरीधर आकाश, व्यंकटेश्वर रेड्डी, काव्या एल. यांनी अनुषा, रघुवंशी, कोटी रेड्डी यांना ‘धबधबा पाहू नका’ असे सांगून ते त्र्यंबकेश्वरला निघून आले.

दरम्यान, अनुषा, रघुवंशी आणि कोटी रेड्डी हे त्र्यंबकेश्वरला परतले नाही म्हणून (दि.18) सकाळी 10 वाजता वरील तिघे परत घटनेच्या ठिकाणी त्यांना शोधण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना धबधब्याजवळील पाण्यात अनुषाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर त्यांनी गावकर्‍यांना ही माहिती दिली. यानंतर गावकर्‍यानी त्र्यंबकेश्वर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. दरम्यान, अनुषाचा मृतदेह सापडला असला तरी रघुवंशी व कोटी रेड्डी हे अद्याप बेपत्ता आहेत. पोलिसानी या घटनेची माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली आहे.

तिघे विद्यार्थी बेपत्ता असल्याचे कळते, त्यातील अनुषाचा मृतदेह मिळाला आहे. दोन रेस्कू टिमपैकी एक टिम अनुषाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दुसरी टिम दोघा बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे.
-राम कर्पे, सहायक पोलीस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com