जिल्ह्यातील कलाकारांना आर्थिक मदत करावी; ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जिल्ह्यातील कलाकारांना आर्थिक मदत करावी; ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नाशिकरोड । का. प्र.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आदेशीत केलेल्या लॉकडाऊनमुळे भारतात सकारात्मक परिणाम दिसत आहेत. संचारबंदीमुळे समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असले तरी अजून काही दिवस संयम ठेवणे गरजेचे आहे. मनोरंजन क्षेत्रातील ऑर्केस्ट्रा कलावंतही याला अपवाद नाहीत. मात्र केवळ याच कलेवर उदरनिर्वाह करणाऱ्या कलाकारांना कोरोनाचा जबर फटका बसत असून पुढील दोन-चार महिने हातातोंडाशी भेट होणे दुरापास्त बनले आहे. अशा कलावंतांनी थेट मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री व पालकमंत्री यांना आर्थिक मदतीसाठी निवेदन सादर केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील (वाद्यवृंद) अनेक गायक, गायिका, वादक, डान्सर, कॉमेडियन, निवेदक, साऊंड ऑपरेटर आणि हेल्पर हे लग्न समारंभ, वाढदिवस, महापुरुषांच्या जयंत्या, कौटुंबिक मनोरंजन, महोत्सव, तसेच आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे रसिकांचे मनोरंजन करून मिळणाऱ्या मानधनावर आपला उदरनिर्वाह करत असतात. या सर्व कलाकारांचा प्रपंच फक्त या कलेवरच अवलंबून आहे. हे कलावंत कला सादर करतील तेव्हाच त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था होत असते.

नाशिक जिल्ह्यातील सुमारे ८०% कलाकारांचे घर फक्त कार्यक्रमांवरच चालते. जानेवारी ते मे या कालावधीत असे कलावंत नियोजित कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनावर पुढील वर्षाचे चरितार्थ चालवण्याचे गणित मांडतात.

सद्य परिस्थितीत या कलावंतांनी ठरलेले सर्व कार्यक्रम रद्द केले असून एप्रिल महिन्याच्या सर्व तारखा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मे आणि जून महिन्याचे कार्यक्रम होतील की नाही याबाबत साशंकता आहे. बुक झालेल्या अनेक तारखा रद्द कराव्या लागल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलाकारांवर उपासमारीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यात जून महिन्यात मुलांचा शैक्षणिक खर्च कसा करायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रसिकांची अविरत सेवा व करमणूक करणाऱ्या अशा कलाकारांसाठी शासकीय मदत म्हणून आर्थिक नियोजन करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे उमेश गायकवाड, सुनील ढगे, रवी बराथे, राजेंद्र उबाळे, कमलेश शिंदे, गोकुळ पाटील, फारूक पिरजादे आदींनी मंत्री महोदयांना सादर केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com