Saturday, April 27, 2024
Homeनाशिकगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना

गंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना

नाशिक । कोरोना संकटाने अर्थव्यवस्था कोलमडली असून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ येउन ठेपली आहे. गंगापूर गावातील कुंदन डंबाळे यांनी त्यांच्या शेतात फुलकोबी लावली होती. पण लाॅकडाउनमुळे बाजार समितीत लिलाव बंद आहेत. त्यामुळे विक्रिसाठी नेलेली दोन पिकअप कोबी त्यांना नाईलाजास्तव शेतात जनावरांसाठी चारा म्हणून टाकावी लागली. चार पैसे हातात खुळखुळतील ही अपेक्षा फोल ठरली. त्यांच्यासाठि कष्टाच्या घामाने पिकवलेले सोनं आज मातीमोल झाले असून डोळ्यात आता फक्त अश्रू उरले आहेत.

देशावर कोणतेही संकट येऊ त्यात सर्वाधिक बळिराजाच भरडला जातो. हे कोरोना संकटाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या डोळ्यात कोरोनाने अश्रू आणले आहे. द्राक्ष, कांदा, भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गंगापूर गावात राहणार्‍या कुंदन या होतकरू शेतकर्‍याने अर्धा एकरमध्ये फुलकोबी लावली होती. बियाणासाठी त्यांना सहा हजार रुपये खर्च आला. महिनाभरात फुलकोबीची रोपे तयार होण्यास मेहनत घेतली. त्यावरअळी पडू नये, करपा रोग होउ नये यासाठी औषध फवारणी केली. खतपाण्यासाठी खर्च केला. डोळयात तेल घालून काळजी घेतल्याने पाच ते सहा पिकअप फुलकोबी निघाला.

- Advertisement -

फुलकोबीतून सर्व खर्च वगळता तीस ते चाळीस हजार उत्पन्न मिळेल हा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर होता. पण लाॅकडाउनने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. शरदचंद्र मार्केटमध्ये लिलाव बंद असल्याने विक्रीसाठी आणलेला दोन पिकअप फुलकोबी तसाच शेतात नेण्याची वेळ आली. पर्यायच नसल्याने फुलकोबी शेतात जनावरांना चारा म्हणून टाकावी लागली.

फुलकोबीसाठी तीन महिने शेतात केलेली मेहनत लाॅकडाऊनमुळे वाया गेली. पदरच्या खिशातून केलेला खर्च सोडा फुलकोबीतून साधे एक रुपयाचे उत्पन्न देखील मिळाले नाही. शेतात अजून तिन पिकअप निघेल इतकी फुलकोबी आहे. पण आता करायचे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कोरोनाने आठवण म्हणुन त्यांच्या डोळयात फक्त अश्रू ठेवले आहे.

तीन महिने मेहनत घेऊन शेतात फुलकोबी घेतली. तीस ते चाळीस हजार उत्पन्न मिळेल ही अपेक्षा होती. पण लाॅकडाऊनमुळे बाजार समितीत लिलाव बंद आहेत. त्यामुळे फुलकोबी शेतात जनावरांना चारा म्हणून टाकली. सर्व मेहनत वाया गेली.
– कुंदन डंबाळे, शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या