Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकशहरात सर्वच दुकाने सुरू, नागरीकांची गर्दी; नियमांचा फज्जा

शहरात सर्वच दुकाने सुरू, नागरीकांची गर्दी; नियमांचा फज्जा

नाशिक : गेली ४५ दिवस लॉकडाऊन कडकपणे पाळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नियम व अटींसह दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र याचा गैरफायदा उठवत सर्व नियम पायदळी तुडवत सर्व शहरभरात सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली आहेत.

तसेच दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होत असून. सामाजिक अंतर तसेच इतर नियमांचा फज्जा उडत असल्याचे गेली दोन दिवसापासून चित्र आहे. यामुळे शहरात करोनाचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

तिसरा लॉकडाऊन ४ मे पासून सुरू झाल्यानंतर गेली दिड महिन्याच्या लॉकडाऊनमुळे ढासळती आर्थिक स्थिती सावरण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार अखेर जिल्हा प्रशासनाने उद्योंगासह शहरातील व्यावसायिकांना नियम व अटींचे पालन करत गुरूवारपासून (दि.७) दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

यामध्ये अनेक अटी व शर्ती देण्यात आल्या होत्या. दुकाने सुरू करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक होते. प्रत्येक गल्ली अगर चौकात एका लाईनमध्ये 5 दुकानेच सुरू करता येणार होती. दुकानात येणार्‍या ग्राहकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, एकावेळी केवळ ५ ग्राहक आत येतील अशी नियामावली दिली होती.

परंतु जिल्हाधिकार्‍यांचा आदेश सर्वांसाठी असल्याचा समज करत शहरातील झाडून सर्व दुकाने एकाच दिवशी सुरू झाली आहेत. यामध्ये कसलाही नियम पाळला गेलेला नाही. तर दुकानदार नियम पाळत आहेत अगर नाही हे पाहण्याची तसदी कोणत्याही यंत्रणेने घेतलेली नाही.

यामुळे शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, कॉलेजरोड, गंगापूर रोड, पंचवटी, सातपूर, त्रिमुर्ती चौक, यासह शहरासह विविध उपनगरांमधील दुकाने सुरू झाली आहेत. याच्या परिणामी मोठ्या प्रमाणात नागरीकही घराबाहेर पडले आहेत. शहरातील प्रत्येक रस्ता तसेच गल्ली, चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने फिरत असून काही ठिकाणी तर वाहतुक कोंडीचे चित्र निर्माण झाले आहे.

अनेक लोक खरेदी अगर काही कामानिमित्त फिरत आहेत. तर अनेक विनाकारण फिरणारेही दिसत आहेत. शहरातील चौकाचौकात केलेले बॅरिकेंडींग कमी करण्यात आले आहे. तर पोलीसही तुरळकच दिसत आहेत. जे पोलीस चौकात दिसत आहेत. ते कोणालाही न हटकत दुर्लक्ष करत आहेत.

यामुळे शहरात लॉकडाऊन पुर्णपणे संपल्यात जमा आहे. गेली ४५ दिवस पाळलेला लॉकडाऊन पाण्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली असून यामुळे करोनाचा धोका वाढत चालला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या