Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिकमधून २९२४ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात

नाशिकमधून २९२४ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात

नाशिक । आपल्या वैशिट्यपूर्ण चवीमुळे अवघ्या जगात मागणी असणार्‍या नाशिकच्या द्राक्षांचा हंगाम काहीसा उशिराने सुरु झाला आहे. अवकाळीचा फटका आणि लांबलेल्या थंडीमुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाला असला तरी बुधवार ( दि.१५) अखेर जिल्हयातून २९२४ मेट्रिक टन निर्यात झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

नाशिकमधून यूरोप आणि नॉन युरोप देशांमध्ये द्राक्ष निर्यातीचे वर्गीकरण करण्यात येते. दोन दिवसांतील आकडेवारीनुसार युरोपात ७१० मेट्रिक टन तर नॉन यूरोपीय देशांमध्ये २२१० टन द्राक्ष पाठविण्यात आले आहेत. द्राक्ष निर्यातीसाठी आवश्यक असलेले फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कृषी विभागाकडे शेतकर्‍यांना प्लॉट नोंदणी करावी लागते.

- Advertisement -

दि.१५ जानेवारी अखेर यासाठी २८२०१ प्लॉटची नोंदणी झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. नाशिकमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता आहे. खराब वातावरणामुळे बागा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे द्राक्षांच्या दर्जावर परिणाम होऊन निर्यात घटेल असा अंदाज होता. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ जानेवारी पर्यंतची निर्यात आश्वासक म्हणावी लागेल अशी परिस्थिती आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीत याच कालावधीत १२१६ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात करण्यात आली होती.

या हंगामात दुबईसह नेदरलँड, जर्मनी आणि युनायटेड किंगडममध्ये द्राक्ष पाठवण्यात आली आहेत.जिल्हयात दिवाळीत झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झाले. त्यामुळे हंगामपूर्व द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली. तर वेगवेगळ्या टप्प्यात असणार्‍या बागांनाही झळ सहन करावी लागली होती. केवडा, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने काहींना बागा सोडून द्याव्या लागल्या. या परिस्थितीत निर्यातीसाठी नोंदणी करणार्‍या उत्पादकांची संख्या घसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या