पहिली ते आठवीच्या निकालासाठी ‘आकारिक’चा पर्याय? शिक्षण विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा

पहिली ते आठवीच्या निकालासाठी ‘आकारिक’चा पर्याय? शिक्षण विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा

नाशिक : परीक्षा रद्द केल्याने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल कशा पद्धतीने तयार करायचा, हा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी ‘आकारिक मूल्यमापना’चा पर्याय उपयुक्त ठरणार आहे. त्याबाबत शालेय शिक्षण विभागाने विचार करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने म्हटले आहे.

राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि स्वयंअर्थसाहाय्यित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आकारिक, संकलित मूल्यमापनाद्वारे भारांशाप्रमाणे होते. दि. २० आॅगस्ट २०१० रोजीच्या शासन आदेशानुसार सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून या पद्धतीने मूल्यमापनाची कार्यवाही दरवर्षी केली जाते.

शैक्षणिक वर्षात सत्र एक आणि दोनचे मूल्यमापन केले जाते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘लॉकडाऊन’मुळे शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांना सत्र दोनचा अंतिम निकाल, मूल्यमापन कसे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने आकारिक मूल्यमापनावर आधारित अंतिम निकाल सरासरी पद्धतीने तयार करण्याचा पर्याय मांडला आहे. त्याबाबतचे निवेदन राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना दिले आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयाची शिक्षकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

आकारिक मूल्यमापन म्हणजे?
दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक, प्रयोग, उपक्रम कृती, प्रकल्प, चाचणी परीक्षा यांचा समावेश असणाऱ्या मूल्यमापनाला आकारिक म्हटले जाते. सर्व शाळांतील पहिल्या सत्रातील आकारिक, संकलित मूल्यमापन पूर्ण झाले आहे.

सध्या सर्व शाळांनी आकारिक मूल्यमापन पूर्ण केले आहे. त्यामुळे या मूल्यमापनाच्या गुणावर सरासरी गुण काढून सत्र दोनचा निकाल लवकर जाहीर करता येईल. त्याचा शिक्षण विभागाने विचार करावा, असे राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com