Friday, April 26, 2024
Homeनाशिकएक रुपयात लावले अकरा सामुदायिक विवाह

एक रुपयात लावले अकरा सामुदायिक विवाह

येवला । मानवजातीला आणि समाजसेवेला कोणतेही बंधने नसतात. सचोटी अन् प्रयत्न असले की ध्येय आपोआप साध्य होते. गरजूंना मदतीचा हात देता येतो हेच अधोरेखित करणारा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा येथे पार पडला. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकीतून झालेल्या या सोहळ्यात मुस्लिम बांधवांचे अवघ्या एक रुपयात 11 विवाह लावले गेले.

सावली फाउंडेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट व टिपू सुलतान ग्रुप यांच्या वतीने शहरातील नांदगाव रोड येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 11 जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. मनमाड, वैजापूर, मालेगाव, येवला या ठिकाणच्या गरजूंना येथे आपली विवाहगाठ बांधता आली. या 11 जोडप्यांतील नवरा मुलाला कपडे, चांदीची अंगठी, घड्याळ, नवरी मुलीला मंगळसूत्र व आहेरामध्ये पलंग, मांडणी, गादी व सर्व संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून या ग्रुपतर्फे दिले गेले. वर्‍हाडी मंडळींसाठी जेवण व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisement -

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, काझी रफिउद्दिन शेख, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, अमजद शेख, एजाज शेख प्रमुख उपस्थित होते. गरिबांच्या लग्नाला हातभार लागावा व जातीय सलोखा राखण्याच्या उद्देशाने या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.

या सामुदायिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळाचे अध्यक्ष दीपक वर्दे व कार्यकर्ते, छोटे व्यावसायिक तर काही मोलमजुरी करणारे असून, त्यांनी आठवडाभराच्या मजुरीतून काही रक्कम या कार्यासाठी वेगळी काढली तसेच शहरातील काही दानशुरांच्या मदतीने हा विवाह सोहळा यशस्वी पार पडला.

मंडळाचे अध्यक्ष संजय वर्दे, सचिव रिजवान शेख, जुबेर शेख, दादाभाई शेख, आलमगीर शेख, गफ्फार न्हावी, खजिनदार अतिक अन्सारी, इम्रान शेख, संघटक रईस अन्सारी, अनिस अन्सारी, जैनूद्दीन शेख, फारूक शेख आदींनी या सोहळ्याचे नियोजन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या