Thursday, April 25, 2024
Homeनगरनगर तालुक्यात अकरा भरारी पथके

नगर तालुक्यात अकरा भरारी पथके

अहमदनगर (वार्ताहर)- करोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर तालुका प्रशासनाने 11 भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकाद्वारे गर्दी नियंत्रणात ठेवणे, सोशल डिस्टंन्सिग राखणे, मास्क वापरणे, पर्यवेक्षण करणे, पोलीस विभागास सहकार्य करणे, लाऊड स्पीकरद्वारे जनजागृती करणे, वाहन तपासणी करणे आदी विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.

नगर तहसील कार्यालयात चोवीस तास कंट्रोल रूम कार्यरत ठेवण्यात आले असून बेरोजगार व स्थलांतरीत व्यक्तींची पाच शेल्टर होममध्ये राहणे व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा हजार व्यक्तींना जेवण तसेच तीनशे ते चारशे व्यक्तींना किराणा व धान्य देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गावात तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची समिती स्थापन करण्यात आली असून याद्वारे होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे तसेच संशयित व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. क्वारंटाईन व्यक्तींसाठी 3 सेंटर उभारले असून यामध्ये 500 ते 700 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

भातोडी पारगावला चेकपोस्ट
अहमदनगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवर भातोडी पारगाव येथे चेकपोस्ट स्थापन करण्यात आले असून या ठिकाणी तीन अधिकार्‍यांची प्रत्येकी आठ तासाप्रमाणे तेथे 24 तास अधिकारी उपलब्ध असतो. प्रत्येक वाहनांची तपासणी करून, त्यांची नोंद करून प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्कॅनिंग केली जात आहे. संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे.

फूड बँक कार्यरत
गरजू व्यक्तींना किराणा वाटपाची व्यवस्था केली असून आत्तापर्यंत 26 हजार किराणा किट वाटप करण्यात आले आहेत. या किटमध्ये पाच किलो गहू, अडीच किलो तांदूळ, दोन किलो डाळ, दीड किलो साखर, एक किलो खाद्यतेल आदींचा समावेश आहे.

करोना केअर सेंटर
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सौम्य आजारांची लक्षणें असणार्‍यांसाठी 135 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डेडिकेटेड करोना हेल्थ सेंटर म्हणून ग्रामीण रुग्णालयात 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या