Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर, शेवगाव, पाथर्डीत ‘अवकाळी’चा दणका

Share
नगर, शेवगाव, पाथर्डीत ‘अवकाळी’चा दणका, Latest News Nagar Shevgav Pathardi Rain Problems Crops Ahmednagar

गहु, ज्वारी, हरभरा, आंबा, संत्रा पिकांचे नुकसान

अहमदनगर, पाथर्डी (प्रतिनिधी)- अहमदनगर, शेवगाव आणि पाथर्डी शहर तसेच तालुक्यातील विविध भागांत काल अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपिटही झाली. या आस्मानी संकटात गहू, हरभरा, ज्वारीसह आंबा आणि संत्रा फळपिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका खळ्यात मळ्यात उघड्यावर काढून ठेवलेला गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना बसला. हे पीक झाकण्यासाठी शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. या नवीन संकटामुळे शेतकरी हबकून गेला आहे.

नगर शहर, भिंगार, नागरदेवळे यासह अन्य ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. त्यात गहू पिकाला फटका बसला.
खरवंडी कासार वार्ताहराने कळविले की,- पाथर्डी शहरासह तालुक्यात झालेल्या रविवारच्या दुपारच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह सुसाट वार्‍याने आलेल्या गारा व पावसाने शेतकर्‍यांचे गहू, फळझाडे, कांदा, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरात सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून रविवार रोजी सायंकाळी चार वाजता आलेल्या सोसाट्याच्या वार्‍याबरोबर तब्बल दीड तास तळ ठोकला. या दरम्यान गाराही कोसळल्या. त्यात गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले.

खरवंडीसह पंचक्रोशीतील परीसरात चांगलेच पाणी वाहिले सुरवातीला आलेल्या वार्‍यामुळे गव्हाचे पीक अनेक ठिकाणी खाली पडले आहे. या कोवळ्या दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या या पिकाची मोठी नासाडी झाली आहे. सोसाट्याचा वार्‍यामुळे कोवळ्या गहू पिकाच्या ओळीच्या ओळी शेतात पसरल्या आहेत सरकारने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. भगवानगड परीसरात रविवार रोजी गारांचा पाऊस पडला तर खरवंडीसह पंचक्रोशीतील परीसरात सोसाट्याच्या वार्‍याबरोबर झालेल्या पावसाने गहू पिक खाली पसरले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शासनाने शेतकर्‍यांना मदत करावी.
– किरण खेडकर पंचायत समिती सदस्य पाथर्डी

अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे कृषीसहाय्यक व तलाठी यांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देउन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवून शेतकर्‍यांना मदत मिळावी. यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.
– नामदेव पाटील तहसिलदार पाथर्डी

करंजी वार्ताहराने कळविले की, पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या गहू, हरभरा, संत्रा, कांदा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे संत्राच्या फळांचा शेतात अक्षरशः सडा पडला होता. त्याचबरोबर गव्हाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे करंजीसह दगडवाडी, भोसे, सातवड, वैजूबाभळगाव या परिसरातील शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडाली.

दरम्यान, करंजी वार्ताहराने कळविले की, पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या गहू, हरभरा, संत्रा, कांदा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे संत्राच्या फळांचा शेतात अक्षरशः सडा पडला होता. त्याचबरोबर गव्हाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे करंजीसह दगडवाडी, भोसे, सातवड , वैजूबाभळगाव या परिसरातील शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडाली.

टाकळीमानुर वार्ताहराने सांगितले की, पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथे काल दुपारी साडेतीन ते सव्वा चार या वेळेमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. या पावसामुळे शेतकर्‍यांची प्रचंड दाणादाण उडाली शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान होऊन शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा आस्मानी संकट वर बरसले शेतात उभ्या असलेल्या गहू हरभरा ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर वीट भट्टीचालक यांचेही प्रचंड नुकसान झाले.

भातकुडगांव वार्ताहर कळविले की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव व परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी तहसीलदार अस्मिता मित्तल यांच्याकडे करण्यात आली. गारपीटीची माहिती मिळताच तहसीलदार मित्तल पथकासह हजर होवुन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामध्ये गारांचा समावेश होता.त्यामुळे गहू, टरबूज, मका, हरबरा या पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले.

तहसीलदार अस्मिता मित्तल यांनी रामभाऊ फटांगरे यांचे टरबूजवाडी व दत्तात्रय नाईकवाडी यांच्या पिकांची पाहणी करण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, मयूर बेरड, कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड, गीतांजली शिरसाठ, पंचायत समितीचे श्रीकांत गोरे, मंडळ अधिकारी रमेश सावंत, आप्पासाहेब शिंदे, तलाठी गणेश लोखंडे, सरपंच राजेश फटांगरे, सचिन फटांगरे, अमोल वडणे, बाळासाहेब वाघमोडे, आबासाहेब फटांगरे, नितीन काळे, अनिल भेंडेकर यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

भातकुडगांव परिसरात गहु, हरबरा, टरबूज पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.वादळामुळे झाडे उफाळून पडले,पिके भुईसपाट झाले. प्रशासनाने तातडीने दखल घेत नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शासनाने तातडीने सरसकट पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खाती जमा करावी.
-राजेश फटांगरे, सरपंच, भातकुडगांव

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!