Tuesday, April 23, 2024
Homeनगरनगर, संगमनेरात करोनाचा उद्रेक

नगर, संगमनेरात करोनाचा उद्रेक

जिल्ह्यात नव्याने 17 पॉझिटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात नव्याने करोना बाधित 14 रुग्ण सापडले असल्याचे सांगण्यात आले. यात संगमनेरमधील चौघांचा समावेश असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र, संगमनेर तालुका प्रशासनाने शनिवारी दिवसभरात तालुक्यात नव्याने सात करोना रुग्ण सापडल्याचा दावा केला आहे. यामुळे काल दिवसभरात जिल्ह्यात नव्याने 17 करोना बाधित रुग्ण समोर आले असून बाधितांचा एकूण आकडा 134 वर पोहचला आहे.

काल सकाळी नगर शहरातील एकाच कुटूंबातील सह ा व्यक्तींना करोनाची लागण झाली असून यातील एका व्यक्तीचा अहवाल हा शुक्रवारी रात्री आलेला आहे. यासह संगमनेर तालुक्यात नव्याने सात जणांना करोना झाला आहे. तसेच निमगाव कोर्‍हाळे येथील बाधितांच्या संपर्कात आल्याने शिर्डी येथील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नगर शहर, संगमनेर आणि निमगाव कोर्‍हाळे या ठिकाणी नव्याने कंटेन्मेंट झोन घोषित करण्यासोबत आजूबाजूचा परिसर हा बफर झोन जाहीर केला आहे. यात कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सर्व सुविधा जिल्हा प्रशासन पुरविणार असून बफर झोनमध्ये अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत.

- Advertisement -

शनिवारी सकाळच्या सत्रात जिल्हा रुग्णालयातील करोना चाचणी प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालात नगर शहरातील सथ्था कॉलेनी येथील एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती करोना बाधीत आढळले आहेत. यात एक महिला आणि चार पुरुषाचा समावेश आहे. यासह संगमनेर येथील दोन व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आला. हे अहवाल जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने ग्राह्य धरला आहेत.

त्यानंतर सायंकाळी प्राप्त अहवालात आणखी सात व्यक्ती करोना बाधित आढळून आल्या आहेत. यात राशीन (ता. कर्जत) येथील 70 वर्षीय पुरुष आणि 14 वर्षीय मुलगी यांचा समावेश असून हे दोघे शुक्रवारी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. तसेच संगमनेर येथील एकाच कुटुंबातील 13 आणि 17 वर्षीय मुले बाधित असून ते शनिवारीच्या बाधित रुग्णाचे नातेवाईक आहेत.

यासह दिवसभरात या ठिकाणी आणखी तिन करोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत. शिर्डी येथील 55 वर्ष वयाची महिला बाधित असून निमगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कात आली होती. तसेच घाटकोपर (मुंबई) येथून धामणगाव पाट (अकोले) येथे आलेला 49 वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असून भांडुप येथून कारेगाव (ता. नेवासा) येथे आलेला 35 वर्षीय युवक देखील करोना बाधित आढळला आहे.

बाधितांचा आकडा 131
जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत महानगरपालिका क्षेत्र 23 आणि उर्वरित जिल्हा 67, इतर राज्य 2, इतर देश 8 इतर व अन्य जिल्हा 31 रुग्णांचा समावेश आहे.

आणखी सहा करोना मुक्त
जिल्ह्यातील आणखी 6 रुग्ण बरे होऊन परतले घरी.नगर शहरातील 3 पाथर्डी, संगमनेर येथील प्रत्येकी 1 आणि संगमनेर येथीलच नाशिक येथे उपचार घेत असलेला रुग्णही बरा झाला आहे. याम ुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 68 झाली आहे.

50 अ‍ॅक्टिव्ह केसेस
जिल्ह्यात सध्या 50 अ‍ॅक्टिव्ह केसेस असून यासह 1 नाशिक, आणि 2 संगमनेर येथील दोन आहेत. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 2 हजार 317 स्त्राव नमुने तपासणी केली असून यात 2 हजार 144 निगेटीव्ह, 25 रिजेक्टेड आणि 15 अहवालाचे निष्कर्ष न निघालेले नाहीत. दिवसभरातील सुमारे 30 अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडून कळविण्यात आले.

नवजात जुळे निगेटिव्ह
28 मे रोजी करोना बाधीत महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. या जुळ्यांची माता करोना पॉझिटिव्ह होती. त्यानंतर अवघ्या एका दिवसांत प्रसृती झालेल्या त्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी या नवजात शिशुंचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचा अहवाल शनिवारी सकाळी आला. यात ते करोना निगेटिव्ह आले आहेत.

एकाच दिवसात 7 जणांना करोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)- शहरातील मोमीनपुरा येथे 1, भारतनगर येथे 2, मदिनानगर येथे 2 तर निमोण व सिन्नर येथे प्रत्येकी एक असे एकूण 7 व्यक्ती करोना बाधीत शनिवारी आढळून आल्याने संगमनेरकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात करोनाने शिरकाव केल्याने करोना बाधीतांची संख्या 40 वर पोहचली आहे. प्रशासनाने तातडीने सदर परिसर सील केला आहे. तर मोमीनपुरा येथील बाधीत रुग्णाच्या संपर्कातील 10 व्यक्तींना नगर जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. करोना बाधीत अहवालामध्ये पाच अहवाल खासगी लॅब तर दोन अहवाल जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झाल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

संगमनेरात सलग चौथ्या दिवशी करोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. भारतनगर, रहेमतनगर, मदिनानगर, नाईकवाडपुरा, इस्लामपुरा, कुरणरोड त्यापाठोपाठ आता मोमीनपुरा येथेही करोना रुग्ण आढळून आला आहे. मोमीनपुरा भागात राहणार्‍या 71 वर्षीय वृद्धाला करोनाची बाधा झाली आहे. या व्यक्तीबरोबरच भारतनगरमधील 33 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संगमनेरकरांची चिंता आता वाढली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अभय परमार हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य पथकही तातडीने दाखल झाले. सदर परिसर सील करण्यात आला आहे. करोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील 10 व्यक्तींना आरोग्य प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्यांना पुढील तपासणीसाठी नगर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

दुपारनंतर प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेरातील भारतनगर येथील एक 54 वर्षीय महिला, निमोण येथील एक 75 वर्षीय वृद्ध तर सिन्नर येथील 56 वर्षीय वृद्ध असे तीन करोना बाधीत आढळले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने भारतनगर व परिसरातील नागरीकांचा सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सिन्नर तालुक्यातील एका व्यक्तीने संगमनेरात येवून तपासणी केली होती. त्यामुळे त्याचा अहवाल संगमनेरात आल्याने संगमनेर करोनाच्या संख्येत एकने वाढ झाली आहे.

दरम्यान, संगमनेर शहरातील भारत चौक, अशोक चौक, ते शिवाजी पुतळा परिसर, मोमीनपुरा व लगतचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून तहसिलदार तथा इन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांनी घोषीत केले आहे. दि. 30 मे 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 12 जून 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सदर क्षेत्रातील सर्व आस्थापना, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री, सदर क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत आहे. सदर सील करण्यात आलेल्या परिसरासाठी सनियंत्रण अधिकारी श्रीनिवास पगडाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर पोखरकर, सहाय्यक सनियंत्रण अधिकारी पोमल तोरणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तसेच गुरुवारी मदिनानगर मधील एका 40 वर्षीय महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिच्या 13 व 17 वय असलेल्या दोन मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांचे स्वॅब घेण्यात आले. काल त्या दोन्ही मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

दरम्यान श्रीरामपूरच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी संगमनेरात येवून प्रतिबंधात्मक क्षेत्राची पाहणी केली. प्रतिबंध केलेल्या क्षेत्राकरीता पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी तहसिलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, डीवायएसपी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक अभय परमार, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप आदि उपस्थित होते.

येथे सापडले रुग्ण
संगमनेर शहरातील मोमीनपुरा येथे 1,
भारतनगर येथे 2, मदिनानगर येथे 2
तर निमोण व सिन्नर येथे प्रत्येकी 1

करोनाबाधित महिला आढळली; शिर्डी 14 दिवस बंद

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील शिर्डी नजीकच्या निमगावातील भाजीविक्रेती महिलेसह तिच्या कुटुंबातील सहा जणांना करोनाची लागण झाली असताना शनिवारी शिर्डीत वास्तव्यास असलेल्या सुनेच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून प्रशासनाने शिर्डी शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला असून चौदा दिवस शिर्डी शहर अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

साईबाबांच्या शिर्डीत बाबांच्या हयातीपासून कोणत्याही साथरोगाचा शिरकाव झाला नाही. देशविदेशातील अनेक साईभक्त शिर्डीत येऊन गेले. मात्र लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपायला केवळ एक दिवस बाकी असतानाच शिर्डीत महिला पॉॅझिटिव्ह रुग्ण निदर्शनास आले. त्यामुळे शहरात सर्व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिर्डी नजीकच्या निमगावातील भाजीविक्रेत्या महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न होताच तिच्या संपर्कातील तसेच परिवारातील लोकांना तपासणीसाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये तिच्यासह कुटुंबातील तसेच शिर्डीतील एका महिला अशा एकूण सहा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या घटनेने शिर्डीत शांतता पसरली आहे. दरम्यान गुरुवारी नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या सहा जणांचा रिपोर्ट येणे बाकी होते. त्यापैकी शनिवारी सायंकाळी या सहा लोकापैकी शिर्डीत वास्तव्यास असलेल्या एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने सतर्कता म्हणून आजपासून पुढील चौदा दिवस शिर्डी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले. सदरील घटना कळताच शहरातील गल्ल्या रहिवाशांनी सील केल्या आहेत. विनाकारण रस्त्यावर कोणालाही फिरता येणार नाही. शिर्डी शहरातील सर्व नागरिकांची पुढील सात दिवसांत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

शहर पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याने शहरात बाहेरच्या व्यक्तींना येता जाता येणार नाही. साईबाबांच्या शिर्डीत करोनाचा शिरकाव झाल्याने पोलीस प्रशासनाच्या आदेशाला डावलून आता रस्त्यावर बेधडक मॉर्निंग आणि इव्हेनिंग वॉक करणार्‍या लोकांना पश्चातापाची वेळ उद्भवली असून आजपासून सर्तकता बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्वानी घरात बसून राहणे हाच करोनावर मात करण्याचा एकमेव पर्याय आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या