संदीप निचित नवे निवासी उपजिल्हाधिकारी

संदीप निचित नवे निवासी उपजिल्हाधिकारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे येथे मेट्रो रेल कॉर्पोरेशन या पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असणारे उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची नगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तातडीची उपाययोजना म्हणून निचित यांची नगरला बदली करण्यात आल्याचे आदेश राज्याच्या महसूल विभागाने शुक्रवारी काढले.
उपजिल्हाधिकारी निचित यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. यासह संगमनेर विभागाची प्रांत अधिकारी म्हणून त्यांनी चार वर्षे यशस्वी कामगिरी केली आहे. नगरमधून त्यांची महाराष्ट्र रेल कार्पोरेशन, पुणे उपजिल्हाधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली होती.
जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर असताना निचित यांनी ऑनलाइन पॉस मशिनद्वारे रेशन धान्य वाटपाबाबत उत्कृष्ट नियोजन करून नगर जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण कामगिरी केली. पुन्हा एकदा नगर जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची नियुक्ती जिल्ह्यासाठी महत्वाची ठरणार हे निश्‍चित. नगर जिल्ह्यात यापूर्वी केलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेता आता नगरच्या उपजिल्हाधिकारी पदी काम करणे त्यांना अधिक सोपे जाणार आहे.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com