Friday, April 26, 2024
Homeनगरनगर बाजार समिती पदाधिकारी निवडीनंतर लगेच वादाचे ढग

नगर बाजार समिती पदाधिकारी निवडीनंतर लगेच वादाचे ढग

घिगे, म्हस्के यांच्या निवडीवर संचालक नाराज, सचिवांना निवेदन

अहमदनगर (वार्ताहर) – कै. दादा पाटील शेळके कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभापती अभिलाष घिगे व उपसभापती संतोष म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतरच याला संघर्षाचे स्वरूप आले आहे. नाराज संचालकांनी मासिक सभा झाल्याशिवाय कोणतेही कामकाज करू नये, असे पत्र समितीच्या सचिवांना दिले आहे.

- Advertisement -

समितीच्या सभापती-उपसभापती पदासाठी अभिलाष घिगे आणमि संतोष म्हस्के यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पदासाठी बाबासाहेब खरसे, बबनराव आव्हाड, दिलीप भालसिंग यांनी दावा केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिगविजय आहेर यांनी काम पाहिले. निवडीनंतर सभापती, उपसभापतींचा सत्कार माजी आमदार शिवाजी कर्डिले, आ. अरुण जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अक्षय कर्डीले, माजी सभापती विलासराव शिंदे, उपसभापती रेशमाताई चोभे, मीराताई कार्ले, हरीभाऊ कर्डीले, रेवणनाथ चोभे दिलीप भालसिंग, संतोष कुलट, बन्सी कराळे, बाबासाहेब खर्से, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब जाधव, वसंतराव सोनवणे, बबनराव आव्हाड, उद्धवराव कांबळे, राजेंद्रकुमार बोथरा, बहिरू कोतकर, रावसाहेब साठे, शिवाजी कार्ले, सचिव अभय भिसे उपस्थित होते.

मात्र निवडीनंतर संचालकांतील नाराजी उफाळून आली. त्यांनी पुढील मासिक मिटिंग झाल्याशियाय नूतन सभापती-उपसभापती यांच्या सह्या मान्य न करण्याची मागणी सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, बाजार समितीची नूतन सभापती व उपसभापतीच्या सह्या पुढील मासिक मिटिंग झाल्याशिवाय मान्य करण्यात येऊ नयेत. तसेच संस्थेचे कोणतेही कामकाज तोपर्यंत करण्यात येऊ नये. निवेदनावर संचालक बन्सी कराळे, उद्धव कांबळे, बाबासाहेब जाधव, बबन आव्हाड, माजी सभापती हरिभाऊ कर्डीले, मीराबाई कार्ले, दिलीप भालसिंग, बाळासाहेब निमसे, संतोष कुलट आदींच्या सह्या आहेत.

माजी सभापती अनभिज्ञ
विरोधी संचालकांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात दै. सार्वमतने प्रतिक्रिया विचारली असता मी पुणे येथे असून याबाबत मला काहीही माहिती नसल्याचे माजी सभापती हरिभाऊ कर्डीले यांनी सांगितले. कर्डिले यांची या निवेदनावर सही आहे. तसेच माझी सही कशी, असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच निवेदनावर सही असलेले बन्सी कराळे यांनी निवेदन सचिवांना दिल्याचे मान्य केले. मात्र यावर अधिक बोलण्यास नकार दिला. तर दिलीप भालसिंग यांना वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या