Type to search

नगर-कोपरगाव रस्ता व बाह्यवळणची आज खंडपीठात सुनावणी

Share
नगर-कोपरगाव रस्ता व बाह्यवळणची आज खंडपीठात सुनावणी, Latest News Nagar Kopargav Road Bench Hearing Pimpri Nirmal

रस्त्याचे काम बंदच; शिर्डी बाह्यवळण रस्ता अत्यंत खराब; प्रवाशांचे प्रचंड हाल

पिंप्री निर्मळ (वार्ताहर)- कोल्हार कोपरगाव चौपदरीकरण तसेच पिंप्री निर्मळ-सावळीविहीर असा बाह्यवळण रस्ता खासगीकरणातुन करण्यात आला. पिंप्री निर्मळ येथे टोलनाकाही सुरू करण्यात आला आहे. मात्र या दोन्ही रस्त्याची दुरूस्ती अभावी अवस्था अंत्यत बिकट झाल्याने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा टोलनाका दि. 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला असुन 17 फेब्रुवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

मात्र कंपनीने काम सुरू केले नसून खराब रस्त्यामुळे प्रवाशांचे व बाह्यवळणला राहणार्‍या रहिवाशांचे प्रंचड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज होणार्‍या सुनावणीत न्यायालय काय निकाल देते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

राज्य सरकारने कोल्हार कोपरगाव चौपदरी रस्ता तसेच राहाता शिर्डी शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पिंप्री निर्मळ ते सावळीविहीर असा 23 किमीचा रस्ता सुप्रीम या खाजगी कंपनीच्या माध्यमातून केला आहे. यासाठी कंपनीला मार्च 2021 पर्यंत टोल वसुली करण्याची परवानगी होती. टोल सुरू असेपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती तसेच देखभालीची जबाबदारी या कंपनीची होती.

कंपनीकडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने बाह्यवळणसह मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दररोज अनेक अपघात घडत आहेत.तसेच बाह्यवळण परिसरातील शेतकर्‍यांना व रहिवाशांना अपघातासह धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेनेने याबाबत अनेक आंदोलनेही केली होती.रस्ता दुरूस्तीसाठी औरगाबाद न्यायालयात शिर्डीचे शिवसेना शहरप्रमुख सचीन कोते यांनी जनहीत याचिका नं. 140/2019 दाखल केली.

यावर निकाल देतांना 12 डिसेंबरपासून टोलनाका बंद करून 17 फेब्रुवारीपर्यंत कंपनीने किंवा कंपनीच्या खर्चाने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र सुप्रीम कंपनीने मुदतीत काम सुरू केलेले नसून जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी शासनाकडे रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी केली आहे.टोल कंपनी काम करीत नाही व बांधकाम विभागानेही निधीसाठीचे कागदी घोडे शासन दरबारी नाचविले आहे.

प्रत्यक्षात काम मात्र बंद असून प्रवाशांचे व बाह्यवळणच्या रहिवाशांचे जीवन संकटमय झालेले आहे. मुदतीत काम सुरू न झाल्याने व शासनाकडूनही निधी अद्याप न मिळाल्याने आजच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

रस्ता दुरूस्तीचा खर्च जवळपास 65 कोटी आहे तर संंबंधित टोल वसूल करणार्‍या कंपनीची टोल वसुलीची मुदत मार्च 2021 मध्ये संपते. त्यामुळे रस्ता दुरुस्त केल्यास होणारा खर्च येत्या वर्षभरात टोल वसुलीतून वसूल होणार नसल्यामुळे कंपनीकडून रस्ता दुरुस्तीसाठी टाळाटाळ होत असल्याची चर्चा परिसरातून होत आहे.

न्यायालयाच्या आदेशाने पिंप्री निर्मळ येथील टोल नाका बंद करून कंपनीच्या खर्चाने 17 फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र कंपनीकडून काम सुरू न झाल्याने जागतीक बँक प्रकल्प विभाग अ.नगर यांनी नगर कोपरगाव रस्ता व बाह्यवळण रस्ता दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडे 65 कोटींची मागणी केली आहे.
– रवींद्र चौधरी, अभियंता.जागतीक बँक प्रकल्प.अ.नगर

Leave a Comment

error: Content is protected !!