Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरच्या वाट्याला वजनदार खाती

Share
नगरच्या वाट्याला वजनदार खाती, Latest News Nagar Importance Khati Political Ahmednagar

थोरातांकडे महसूल : गडाखांकडे जलसंधारण तर तनपुरेंना ऊर्जा व नगरविकासची शक्यता

अहमदनगर/मुंबई (प्रतिनिधी) – राज्य मंत्रिमंडळात तीन मंत्र्यांना स्थान मिळाल्याने आपले राजकीय स्थान अधोरेखित करणार्‍या नगर जिल्ह्याच्या वाट्याला वजनदार खाती येण्याची चिन्हे आहेत. राज्य काँग्रेसचे मातब्बर नेते ना. बाळासाहेब थोरातांकडे महसूल खाते येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सेनेचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांना जलसंधारण तर राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे ऊर्जा व नगरविकास ही खाती येणार अशी दाट शक्यता आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाची अंतिम यादी राज्यपालांकडे सहीसाठी पाठविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र उशिरापर्यंत खातेवाटप जाहीर झाले नव्हते.

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तारानंतरही रखडलेल्या खातेवाटपावर विरोधकांनी राळ उठवल्यानंतर शनिवारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी जोरदार हालचाल केली. शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप अंतिम केल्याचे म्हटले जाते. यादी सहीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आली, अशी माहिती होती. मात्र उशिरापर्यंत खातेवाटप अधिकृतरित्या जाहीर नव्हते.

संभाव्य यादी वृत्तवाहिन्यांच्या हाती आली होती. त्यानुसार राज्याच्या मंत्रिमंडळात नगरच्या वाट्याला वजनदार खाती आल्याचे समोर येत आहे.
ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खाते येणार हे निश्चित झाले आहे. ना.थोरात यांनी यापूर्वीही महसूलमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा राज्याच्या प्रशासनावर पकड ठेवणारे हे खाते पुन्हा त्यांच्याकडे आले आहे. महसूल खात्यावरून ना.थोरात व ना.अशोक चव्हाण यांच्यात चुरस असल्याची चर्चा होती. त्यावर आता पडदा पडल्यात जमा आहे.

ना.शंकरराव गडाख यांनाही दुष्काळी स्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे जलसंधारण खाते मिळणार असल्याचे निश्चित मानले जाते आहे. विशेष म्हणजे ना.गडाख यांनी 2009 ते 2014 या काळात आमदार म्हणून नेवासा मतदारसंघात जलसंधारणाचा गडाख पॅटर्न यशस्वी करून दाखविला होता. त्यांची आवड आणि अभ्यास असलेल्या विषयाचे तसेच शेतकर्‍यांच्या दृष्टीने जबाबदारीचे खाते त्यांना मिळणार आहे, या शक्यतेने त्यांचे समर्थक आनंदात होते.

ना.प्राजक्त तनपुरे यांनाही उर्जा, नगरविकास आणि उच्चतंत्र शिक्षण खाते मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. उद्योग खाते त्यांना मिळणार, अशीही एक चर्चा होती. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्र्यांनाही निर्णयाचे विशेष अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये राज्यमंत्रीही पावरफुल ठरणार आहेत.

संभाव्य खातेवाटप
महाविकास आघाडी सरकारचे रखडलेले खातेवाटप अद्याप जाहीर झाले नसले, तरी खातेवाटपाची संभाव्य यादी बाहेर आली आहे. या यादीनुसार गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याचे दिसून येत आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण खाते सोपविण्यात येणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने गृहमंत्रालय अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच धक्का दिल्याचे म्हटले जात आहे.

संभाव्य खातेवाटप असे : उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन, अजित पवार (उपमुख्यमंत्री) : अर्थ आणि नियोजन, शिवसेना ः एकनाथ शिंदे-नगरविकास, सुभाष देसाई – उद्योग, संजय राठोड – वन, शंकरराव गडाख – जलसंधारण, अनिल परब – परिवहन, उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण, आदित्य ठाकरे – पर्यावरण, दादा भुसे – कृषी मंत्रालय, गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा. राष्ट्रवादी काँग्रेस ः अनिल देशमुख – गृह, छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील – उत्पादन शुल्क, धनंजय मुंडे – सामाजिक न्याय, नवाब मलिक – अल्पसंख्यांक, बाळासाहेब पाटील – सहकार, जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण. काँग्रेस ः बाळासाहेब थोरात – महसूल, नितिन राऊत – ऊर्जा, वर्षा गायकवाड -शालेय शिक्षण, के. सी. पाडवी -आदिवासी विकास, ृअमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक, विजय वडेट्टीवार – मदत आणि पुनर्वसन खार जमीन, यशोमती ठाकूर – महिला बालविकास, अस्लम शेख – बंदर विकार, वस्त्रोद्योग आणि मत्स संवर्धन, सुनिल केदार- दुग्ध विकास आणि पशु संवर्धन.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!