Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगर तालुक्यात आठ हजारांवर होम क्वारंटाईन

नगर तालुक्यात आठ हजारांवर होम क्वारंटाईन

अहमदनगर (वार्ताहर)- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला असून देश विदेश व पुण्या मुंबईसह जिल्ह्याबाहेरून आलेल्या नगर तालुक्यातील 8 हजार 369 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या लोकांनी आपल्या घरातच व तेही स्वतंत्र विलगीकरण रहावे, अशा सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

परेदशातून आलेल्या 37 नागरिकांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे. जिल्हाबाहेरील 8 हजार व राज्याबाहेरील 295 क्वारंटाईनची संख्या झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून या सर्वांसाठी चिचोंडी पाटीलच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात 30 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. अजूनही अनेकजण गावात येत असल्याने तालुका प्रशासनाचा वॉच वाढला आहे. यामध्ये पुणे, मुंबई शहरातून आलेले लोक आता आरोग्य यंत्रणेच्या रडारवर आहेत. तालुक्यातील अशा 8 हजार 369 लोकांना शोधून काढत त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला असून त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

- Advertisement -

नगर तालुका दुष्काळी भाग असल्याने तालुक्यातील अनेक कुटूंबांना उदरनिर्वाहासाठी गाव सोडावे लागले आहे. नगर तालुक्यातील सुमारे 25 हजारपेक्षा जास्त कुटूंबे मूळ गाव सोडून नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसह वेगवेगळया शहरात आहेत. देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने सर्व व्यवहार आणि व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे या कुटूंबांनी पुन्हा आपला मोर्चा गावाकडे वळवला आहे.

या कुटूंबियांमुळे कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव होण्याचा धोकाही तेवढाच वाढला आहे. त्यामुळे बाहेरून आलेले आरोग्य यंत्रणेच्या रडारवर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उप प्राथमिक केंद्र, गावातील आशा सेविका यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने गावोगावी शोध मोहीम सुरू केली आहे. त्यांच्याकडे जावून बारकाईने माहिती घेतली जात आहे. तसेच सर्दी, खोकला यासारखी लक्षणे दिसून येतात का, याचेही निरिक्षण केले जात आहे.

काही संशयास्पद लक्षणे असतील तर त्यांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवले जात आहे. व्यवस्थित वाटल्यास शिक्का मारून त्यांना 14 दिवस इतरांपासून वेगळे रहाण्याचा सल्ला दिला जात आहे. नगर तालूक्यातील 37 परेदशी नागरिकांपैकी अनेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून आता पुण्या मुंबईचे 8 हजार 52 पाहुणे आरोग्य विभागाच्या रडारवर आहेत.

तालुक्यतील होम क्वारंटाईन
तालुका बदलून आलेले- 253
जिल्हा बदलून आलेले- 8052
राज्य बदलून आलेले- 295
देश बदलून आलेले- 37
एकुण- 8 हजार 637
शिक्का मारलेले-8 हजार 369

- Advertisment -

ताज्या बातम्या