Wednesday, April 24, 2024
Homeनगरआठ दिवसांत नगरमध्ये होणार करोनाची चाचणी

आठ दिवसांत नगरमध्ये होणार करोनाची चाचणी

एक कोटींच्या प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात । करोनासह विषाणूजन्य सर्व आजारांची होणार तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरच्या जिल्हा रुग्णालयात करोना चाचणीसाठी उभारण्यात येणार्‍या अद्ययावत प्रयोग शाळेचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी आवश्यक असणारी मशिनरी आली असून त्या मशिनरी आणि अन्य साहित्य बसवून येत्या आठ दिवसांत जिल्हा रुग्णालयातच करोनाची चाचणी करता येणे शक्य होणार आहे. यासह सर्वात महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी चाचणीसाठी येणारा खर्च शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे अल्प राहणार आहे.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील करोनाचा वाढता संसर्ग पाहून जिल्हा रुग्णालयातच करोना चाचणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात करोना चाचणीसाठी यंत्रणा नसल्यामुळे, करोना संशयितांच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठवावे लागत असत.

त्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेतून हे स्राव पुण्याला घेऊन जावे लागत असे. दिवसभरात सर्व स्राव गोळा झाल्यानंतर ते पाठविले जात. परिणामी, अहवाल येण्यास उशीर लागत होता. वेळेसह पैशांचा अपव्यय होत होता. त्यामुळे प्रशासनाने आता नगरमध्ये करोना चाचणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या प्रयोग शाळेसाठी सुमारे 1 कोटी रुपयांची मशिनरी उपलब्ध झाली असून, ती कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रात जिल्हा रुग्णालयातील लॅबमधील कर्मचार्‍यांना सामावून घेतले असून, त्यांना औरंगाबाद येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुरूवातीला जिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू होणार्‍या प्रयोग शाळेत दररोज 100 चाचण्या होतील, असा अंदाज आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णांचा वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे.

करोना चाचणी केंद्रासाठी सर्व मशिनरी उपलब्ध झाली असून, केंद्र उभारणीचे काम वेगात सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली करोना चाचणी केंद्र येत्या आठ दिवसांत प्रत्यक्षात कामाला सुरूवात करण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
– डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक.

करोनानंतर हे होणार उपयोग
करोनाचा प्रभाव संपल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार्‍या या प्रयोग शाळेचा वापर अन्य सर्व विषाणूजन्य आजारांच्या तपासणीसाठी होणार आहे. यात डेंग्यू, चिकनगुणीया, लॅप्टो स्पायरोसीस यासह अन्य विषाणूजन्य आजारांचा समावेश राहणार आहे. यापूर्वी या सर्व आजारांच्या तापसणीसाठी रक्ताचे नमुने पुण्याला पाठविण्यात येत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या