Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

स्वच्छ सर्वेक्षणाचे तिसरे ‘जीएफसी’चे पथकही नगरमध्ये दाखल

Share
कर्मचार्‍याला मारहाण झाल्याने अत्यावश्यक सेवा धोक्यात, Latest News Amc Worker Kill Urgent Service Stop Ahmednagar

महापालिकेचे पदाधिकारी, अधिकार्‍यांपासून सर्वच कर्मचारी लागले कामाला

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेली स्वच्छ सर्वेक्षणांतर्गातील ‘जीएफसी’चे पथक नगरमध्ये काल दाखल झाले असून, त्यांच्या पाहणीनंतरच्या अहवालावर नगरला थ्री स्टार रँकिंग मिळणार का नाही, हे ठरणार आहे. महापौर बाबासाहेब वाकळे, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी या पथकामुळे दक्ष झाले आहेत.

नगर शहराचे रँकिंग मागील वर्षी घसरून एकदम खालच्या पातळीवर गेले होते. त्यामुळे महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत भरभरून निधी देखील मिळू शकला नव्हता. यामुळे पेटून उठलेली महापालिका गेल्या अनेक महिन्यांपासून थ्री स्टार रँकिंग मिळविण्याच्या तयारीला लागली आहे. तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या सेवानिवृत्तीनंतर महापालिकेचा कारभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हाती आला. त्यांनी ओडीएफ आणि स्वच्छता सर्वेक्षण हे दोन्ही मुद्दे गांभीर्याने घेत सर्वच अधिकारी, कर्मचार्‍यांना कामाला लावले.

ते स्वतः रोज सकाळी सात वाजता शहरात फेरफटका मारण्यास बाहेर पडू लागल्याने अधिकारी, कर्मचारीही स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी फिरू लागले. त्याच बरोबर महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही सकाळपासूनच पाहणी सुरू केल्याने स्वच्छता विभागाचे कर्मचारीही पळू लागले. एवढेच नव्हे, तर आयुक्त, महापौर कार्यालयातील कर्मचारीही सकाळी स्वच्छतेसाठी बाहेर पडू लागले.

एकीकडे नियमित कचरा टाकण्यात येणार्‍या जागांचा शोध घेऊन तेथे उघड्यावर कोणी कचरा टाकणार नाही, याची दक्षता घेत असतानाच दुसरीकडे जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली. शहरातील स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालये, ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना, विविध सार्वजनिक मंडळे, विविध संस्था, उद्योजक, व्यापारी, पक्ष कार्यकर्ते, नेते यांच्याशी संवाद साधत स्वच्छतेबाबत सर्वांनाच सक्रीय करून घेण्यात आले. शहरातील स्वच्छता दूत असलेल्या महिला कार्यकर्त्यांनीही यात मोठे योगदान दिले. घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, तो कचरा गाडीतच टाकावा, यासाठी जवळपास घरोघरी जनजागृती करण्यात आली. शाळांमध्येही याबाबत कार्यशाळा घेण्यात आल्या.

या सर्व पार्श्वभूमीवर ‘जीएफसी’चे पथक तपासणीसाठी आले आहे. गारबेज फ्री सीटी (जीएफसी) याची पाहणी हे पथक करणार आहे. सुरूवातीला ओडीएफचे पथक आले होते. त्यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. येथील व्यवस्था चांगली असल्याचे मत या पथकाचे झाले आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षणाचे पथक आले आहे. ते शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता याची पाहणी करणार आहे. काल आलेले जीएफसीचे पथक मात्र रस्ते, सार्वजनिक ठिकाणे यासह शहरात नेहमी उघड्यावर कचरा टाकण्यात येणारी काही ठिकाणे आहेत, त्याचीही पाहणी करणार आहे. शिवाय नागरिकांशी संवाद साधून महापालिकेच्या स्वच्छतेबाबतच्या कामाबाबत त्यांची मते घेणार आहे.

हजाराच्या वर नागरिकांशी बोलणार
‘जीएफसी’ पथकातील सदस्य शहरात स्वच्छतेची पाहणी करतानाच नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये ते नगरमधील एक हजार 20 नागरिकांशी संवाद साधणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात वाढही होऊ शकते. यामध्ये नागरिकांच्या मताला मोठे प्राधान्य राहणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!