Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

नेवासा बसस्थानकाजवळ नाशिकच्या व्यापार्‍याची साडेआठ लाखांची बॅग पळवली

Share
नेवासा : नाशिकच्या व्यापाऱ्यांची साडे आठ लाखाची बॅग पळविली; तासाभरात संशयितास अटक Latest News Nagar Bag Traded in Nevasa Bus Stand

श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असलेल्या दोन्ही आरोपींना अटक एक शेवगावचा तर दुसरा पुण्याचा; दोन दिवसांची पोलीस कोठडी

नेवासा (शहर प्रतिनिधी, तालुका वार्ताहर) – नेवासा येथून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी खासगी वाहनात बसत असलेल्या नाशिकच्या व्यापार्‍याची पाठीमागून आलेल्या तरुणाने साडेआठ लाख रुपयांची बॅग हिसकावून मोटारसायकलवरुन श्रीरामपूरकडे पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली असून पोलिसांनी पळून जाणार्‍या दुचाकीवरील दोघांना अटक केली.

श्रीरामपूर रोडवरील एस कॉर्नरजवळ एका आरोपीला पकडण्यात आले. तर दुसर्‍याला पहाटे पकडण्यात आले. एक आरोपी शेवगावचा तर दुसर्‍या पुणे येथील असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत संजीव रघुनाथ नावल (वय 50, धंदा – व्यापर रा. श्री अपार्टमेंट, कुलकर्णी गार्डनसमोर नाशिक) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी वरील ठिकाणचा रहिवासी असून प्लॉट खरेदी विकी तसेच शेती व्यवसाय करतो. माझ्या नावावर शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे तीन प्लॉट आहेत. या तीन प्लॉटची मी दुपारी 4 च्या सुमारास शेवगाव येथे येऊन दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीदार गणेश उगले, अमर कलाळ, रमेश घोरतळे, किरण घोरतळे व बाळासाहेब इलग यांना विकत दिली. या प्लॉटचे एकूण 8 लाख 52 हजार रुपये माझ्या बॅगमध्ये ठेवले.

खरेदी-विक्री प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बसस्टॅण्डवर नाशिक गाडीबाबत विचारपूस केली असता बसला उशीर असल्याने काळ्या पिवळ्या गाडीने साडेआठच्या सुमारास नेवासा येथे पोहचलो. बसस्टॅण्डमध्ये गाडी नसल्याने मी बस स्टॅण्डच्या बाहेर श्रीरामपूर किंवा नाशिकला जाण्यासाठी काही मिळते का हे पाहण्यासाठी थांबलो. त्यावेळी पैसे असलेली बॅग माझ्या पाठीवर होती. अंदाजे अर्ध्या तासाने एक गाडी आली. त्यात प्रवासी बसत होते.

सदर गाडी श्रीरामपूर येथे जाणार असल्याने मी ही श्रीरामपूरपर्यंत जाण्यासाठी सदर गाडीत मागे बसत असताना अचानक माझी बॅग मागे जोरात ओढली गेली. मी माझी बॅग पुढे ओढत होतो. जोरात बॅग ओढल्यामुळे बॅगचा बंद तुटला. मी मागे वळून पाहिले असता अंदाजे 25 वर्षे वयाचा मुलगा पैशाची बॅग घेऊन पळत होता. मी त्याच्या मागे जोरजोरात ओरडत काही अंतरापर्यंत पाठलाग केला. पुढे काही अंतरावर एक इसम विना नंबरच्या गाडीवर थांबलेला होता.

माझी बॅग घेऊन पळालेला इसम त्या मोटारसायकलवर बसून श्रीरामपूरच्या दिशेने पळून गेले. मी मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने बसस्टॅण्डवरील काही लोक त्यांच्याकडील मोटारसायकलवरुन पुढे पळालेल्या चोरांच्या मागे गेले. तेथे जमलेल्या लोकांनी पोलिसांना फोन करुन सदरचे आरोपी श्रीरामपूरच्या दिशेने गेले असल्याबाबत सांगितले.

माझ्या बॅगेत 2 हजार, पाचशे, 100 व 20 रुपयांच्या अशा 8 लाख 52 हजार रुपये किंमतीच्या नोटा, कपडे, बोधेगाव येथील प्लॉटची कागदपत्रे होती. पोलीस ठाण्यात तक्रार देत असतानाच पोलीस व स्थानिक लोक एका इसमाला घेऊन आले. त्याला मी ओळखले. माझी बॅग घेऊन पळालेला तो इसम होता. मला पोलिसांनी माझी बॅग त्यातील रक्कम व कागदपत्रे दाखविली ती मी ओळखली. त्यानंतर मला सदर इसमाचे नाव सागर राजू माने रा. हिंजवडी (पुणे) असे असल्याचे समजले.

त्यास पोलिसांनी त्याच्या इतर साथीदाराबाबत विचारपूस करता त्याने काही एक माहिती दिली नाही. सदर आरोपीचा पाठलाग करुन संदीप पेचे, काका काळे, दादा काळे, तुषार जायगुडे व इतर यांनी पकडले असल्याबाबत समजले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 99/2020 भारतीय दंड विधान कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हवालदार सोमनाथ कुंढारे करत आहेत.

दरम्यान रात्री सागर राजू माने या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून विनानंबरची मोटारसायकल जप्त केली. त्याच्यामार्फत त्याचा दुसरा साथीदार नारायण नामदेव वाखुरे रा. तळणी ता. शेवगाव यालाही अटक करण्यात आली. अटक केलेल्या दोघा आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रणजित डेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, उपनिरीक्षक श्री. पगारे, गायकवाड, पोलीस नाईक सोमनाथ कुंढारे, महेश कचे, वसीम इनामदार, कॉन्स्टेबल भवार, गुंजाळ, इथापे, कुदळे, आव्हाड यांनी केली.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!