Wednesday, April 24, 2024
Homeनगरना. थोरात दररोज घेताहेत राज्यातील करोना उपाययोजनांचा आढावा

ना. थोरात दररोज घेताहेत राज्यातील करोना उपाययोजनांचा आढावा

संगमनेर (प्रतिनिधी)- राज्यातील विविध भागांतील करोनाची सध्याची परिस्थिती, त्यावर सुरू असलेल्या प्रभावी उपाययोजनांसमवेत वाढलेल्या लॉकडाऊनच्या काळात करोना संपविण्यासाठी करावयाचे काम, जनतेची काळजी याबाबत महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांशी संवाद साधत आढावा घेतला. याचबरोबर नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संगमनेर साखर कारखाना कार्यस्थळावर राज्यातील सर्व आमदार, खासदार व पक्ष पदाधिकार्‍यांबरोबर ना.थोरात यांनी संवाद साधला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे ही उपस्थित होते. ना. थोरात हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत अत्यंत प्रभावीपणे काम करत असून दररोज विभागवार व जिल्हानिहाय आढावा घेत आहेत.

- Advertisement -

महसूलच्या अंतर्गत सर्व जिल्हाधिकारी व आयुक्त येत असून त्यात या विभागांमध्ये व जिल्ह्यांमध्ये करावयाच्या उपाययोजना, सध्याची परिस्थिती, पुढील भविष्यातील कामकाज याचा आढावा घेत आहेत. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सातत्याने पदाधिकारी, काँग्रेस पक्ष कार्यकर्ते, प्रशासन यांच्याबरोबर सतर्कतेने उपाययोजनांचा आढावा घेऊन ते सूचना करत व मार्गदर्शन करत आहेत. या अंतर्गत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र या विभागातील पदाधिकार्‍यांशी संवाद झाला आहे.

संगमनेर येथून काल राज्यातील सर्व काँग्रेसचे आमदार व खासदार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी राज्यातील सध्याची करोनाची स्थिती, करोनाचे जिल्हानिहाय झोन, त्यामधील स्थितीचा आढावा घेऊन उपाययोजनांंची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करताना ना. थोरात म्हणाले, करोना हे संकट जगासह, देशावर व महाराष्ट्रावर आले आहे. संक्रमणातून ते आपल्या घरापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडणे टाळावे.

घरातच राहावे.स्वत: सुरक्षित राहून स्वत:च्या कुटुंबीयांनाही सुरक्षित ठेवावे. मागील अनेक दिवसांत लॉकडाऊनमुळे करोनाचा वाढता प्रभाव आपण रोखू शकलो. आता करोना पूर्ण हटविण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. त्याचप्रमाणे आवश्यक असेल तर बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. मागील काळात जनतेने सरकारला चांगले सहकार्य केले असून राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी करोना वॉरिअर म्हणून चांगले काम केले.

युवक काँग्रसने रक्तदान, अन्नदान यामध्ये पुढाकार घेतला. तर प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते करोनाच्या या संकटात जनतेच्या मदतीला धावले. आता 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्यामुळे सरकार व प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अधिकाधिक चांगले काम करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

करोना संकटात ना. थोरात हे प्रशासन व पक्षपातळीवर अत्यंत प्रभावी काम करत असून सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत नागरिकांच्या विविध अडचणी सोडवत आहेत. इतर राज्यांतील प्रमुखांशी संवादासह विभागवार आढावे, उपाययोजना, नागरिकांना तातडीची मदत यासाठी पुढाकार घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या