Friday, April 26, 2024
Homeनगररेड, ऑरेंज झोनमध्ये अद्यापही लॉकडाऊन – ना. तनपुरे

रेड, ऑरेंज झोनमध्ये अद्यापही लॉकडाऊन – ना. तनपुरे

राहुरीत विविध विभागांतर्गत कामाचा आढावा; नियमांचे पालन करण्याचे आवाहन

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – रेड ऑरेंज झोनमधील भागात लॉकडाऊन कमी झालेले नसून काही भागात पेट्रोल, किराणा, कृषी सेवा केंद्र, यांचा कालावधी मर्यादित असून कृषीक्षेत्राशी निगडित असणारी ठिबक, अवजारे, यांची दुकाने शासकीय निकषाप्रमाणे सुरू करणार असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

सध्या लॉकडाऊन संपलेले नसले तरी कोरोनाची लढाई कायम असून नागरिकांनी आपली काळजी घेत नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन ना. तनपुरे यांनी केले. ना. तनपुरे यांनी काल राहुरी तहसील कार्यालयात विविध विभागांतर्गत सुरू असणार्‍या कामांचा आढावा घेतला. कृषीविभागासह जलसंपदा, महसूल, आरोग्य, नगरपालिका, कायदा व सुव्यवस्था आदी विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आढावा झाल्यानंतर ना.तनपुरे पत्रकार परिषदेत म्हणाले, दि.20 एप्रिलनंतर काही भागात लॉकडाऊनला ढिल देण्याचे संकेत होते. सध्या कृषीक्षेत्राशी निगडित दुकाने सुरू करण्यावर भर देण्यात आलाआहे. राहुरी शहरात किराणा,पेट्रोल दुपारी बारा वाजेपर्यंत उपलब्ध राहील, तालुक्यात कोरोनाबाधित रूग्ण आढळला नसला तरी नियमांचे पालन करीत पुढील काळात वाटचाल करायची असल्याचे ते म्हणाले. आपल्या आमदार निधीतून तालुक्यात एन-90 मास्क 1हजार कीट उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनरेगाची कामे सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

तालुक्यातील कोरोना संशयितांची नगर येथे एकूण 70 जणांची तपासणी झाली. सर्व अहवालनिगेटिव्ह आलेले आहेत. कृषी विद्यापीठात सध्या 240 खाटांचे कोविड केअर सेंटर स्थापन केले असून राहुरी फॅक्टरी येथेही कोविड हेल्थ सेंटरसाठी पन्नास खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सारी या रोगाच्या सर्वेसाठी राहुरी तालुक्यात 217 टीम कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन संदर्भात आर्थिक स्रोत उपलब्धतेसाठी नियोजन असून वांबोरी येथील केएसबी कंपनी सुरू होणार असून औद्योगिक विभागाकडे त्यांनी तशी मागणी केली आहे. कमीतकमी मनुष्यबळ वापरून कंपन्या सुरू केल्या जाणार आहेत. ना. प्राजक्त तनपुरे, तहसीलदार एफ. आर. शेख, आरोग्य अधिकारी नलिनी विखे, सभापती बेबीताई सोडनर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे,जलसंपदा शाखा अधिकारी सायली पाटील, अण्णासाहेब आंधळे, नायब तहसीलदार गणेश तळेकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या