Friday, April 26, 2024
Homeनगरना. गडाख यांनी प्रवरासंगम परिसरात नागरिकांशी साधला संवाद

ना. गडाख यांनी प्रवरासंगम परिसरात नागरिकांशी साधला संवाद

देवगडफाटा (वार्ताहर)- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी काल दि. 24 मे रोजी प्रवरासंगम व देवगड परिसरात नागरिकांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान देवगड देवस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांची भेट घेऊन दर्शन घेतले. ना. गडाख यांनी जनतेशी संवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेतल्या. व्यावसायिकांच्या भेटी घेतल्या व काळजी घेत परवानगी असलेली दुकाने सोशल डिस्टन्स ठेवत सुरू करा असे सांगितले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही घाबरू नये. सर्वांनी धीर धरावा. कुठल्याही प्रकारचं संकट ज्यावेळेस राज्यावर आणि देशावर येतं, त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीनं त्या संकटाचा सामना केला पाहिजे, ही आपली सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे असे ते म्हणाले. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका.दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. करोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे, सर्वांनी नियम पाळावे. सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात सध्या जरी कमी असला तरी काळजी घेतली पाहिजे. विनाकारण.घराबाहेर पडू नका असे आवाहन केले.

- Advertisement -

सोशल डिस्टन्स राखत मास्क वापरून प्रवरासंगम येथे वडाच्या झाडाखाली, सोसायटीच्या प्रांगणात ही अनोखी बैठक पार पडली. आज आरोग्य, महसूल , पोलीस यंत्रणांवर ताण पडत आहे, आपण जर सुरक्षितता बाळगली तर त्यांच्यावरील तणाव कमी होईल ती देखील आपल्यासारखीच माणसे आहेत, असे ते म्हणाले. प्रवरासंगम भागात औरंगाबाद हद्दीवर जिल्ह्याची पोलीस चौकी असल्याने गैरसमजातून पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात किरकोळ वादाचे प्रसंग येतात असे एकाने तक्रारीच्या सुरात सांगितल्याने त्यात तातडीने लक्ष घालतो, काळजी करू नका अशी ग्वाही दिली.

श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन श्रीदत्त प्रभूंचे दर्शन करून आशीर्वाद घेतले. श्रीसमर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पायी पालखी सोहळा करोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भास्करगिरी महाराज यांचे नामदार शंकरराव गडाख यांनी आभार मानले. देवस्थानने बंद काळात मंदिर परिसरात काही कामे केली त्यांची पाहणी महाराज व नामदार शंकरराव गडाख यांनी केली.

प्रवरासंगम परिसरात निवारा केंद्र असल्याने मजुरांना कुठलीही उणीव भासू नये, यासाठी रोज फोनवर नामदार माहिती घेत होते. पायी जाणार्‍या मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली गेली.
– बाळासाहेब पाटील संचालक मुळा कारखाना

- Advertisment -

ताज्या बातम्या