Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुरूम विक्री प्रकरणी बदनामीचा खटला दाखल करणार

Share
मुरूम विक्री प्रकरणी बदनामीचा खटला दाखल करणार, Latest News Murum Sales Problems Defamation Lawsuit Jamkhed

सरपंच विद्या मोहोळकर व डॉ. मोहोळकर यांचा इशारा

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यात 15 ते 20 दिवसांपासून नान्नज येथील मुरूम विक्री प्रकरणाची चर्चा चालू असून नान्नजमधील शासकीय जमिनीतील गट नंबर 866, 867 मधील गौणखनिज मुरुमाची संरपच व सरपंचाच्या पतींनी बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप उपसरपंच तुळशीराम मोहळकरसह आठ सदस्यांनी व ग्रामस्थांनी केला आहे. यावर आता सरपंच व त्यांच्या पतींनी ग्रामस्थांसह येऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत विरोधकांवर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

जामखेडच्या तहसीलदारांसह जिल्हाधिकार्‍यांना या प्रकरणी निवेदन दिले आहे. मंगळवार 21 जानेवारीला सरपंच विद्या सर्जेराव मोहळकर व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सर्जेराव मोहळकर यांनी व नान्नज येथील 300 ते 400 नागरिकांसह तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून गावातील काही नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून मुरूम विक्री प्रकरणाचा खोटा प्रचार व खोट्या तक्रारी तहसीलदारांकडे करण्यात आल्या आहेत.

संरपच व त्यांच्या पतीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. या आरोपात काही तथ्य नसून त्यामागे राजकीय सूड भावना आहे. नान्नज ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आली असून विरोधकांना जनतेपुुढे जाण्यासाठी ठोस मुद्दा नाही. त्यामुळे राजकीय सूडापोटी आरोप केले जात आहेत. डॉ. विद्याताई मोहळकर सरपंच झाल्यापासून त्यांनी गावाचा विकासाच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून गावकर्‍यांचा विश्वास संपादन केला आहे. कामे दर्जेदार करुन आपल्याकडे बोट करण्याची कोणालाही संधी मिळू दिली नाही. आता भ्रष्ट कारभाराची चौकशी केली जाईल आणि भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही, त्यामुळे काही ग्रामपंचायत सदस्य व गावातील विरोधक बिथरले आहेत. त्यांना पारदर्शकता मान्य नसल्याने फक्त संरपचांना त्रास देण्याचा व विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. सर्जेराव मोहळकर यांनी गावच्या विविध विकासकामांसाठी आपल्या वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष केले. आर्थिक झळ सोसून सरपंच व त्यांचे पती आपले कार्य गावाच्या हितासाठी करत आहेत. मात्र हेच तर विरोधकांना नको असल्याने अशा पद्धतीचे चुकीचे आरोप केले जातात. सरपंच विद्या मोहळकर म्हणाल्या, सन 2010 ते 2015 या कालावधीमध्ये तत्कालीन सरपंच संतोष उत्तम पवार यांनी गावामध्ये केलेल्या काही कामांसाठी गट नंबर 866, 867 मधील बराच मुरूम उचलेला असून त्या संदर्भात त्यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी 2015 मध्ये नव्याने सरपंचपदी आलेल्या महिला सरपंच प्रभावती मोहळकर यांनी तक्रारी करून उपोषण केले होते.

त्यानंतर सत्तापरिवर्तन झाल्यावर सन 2015 ते आजतागायत सन 2020 चालू काळात नान्नजचे उपसरपंच तुळशीराम मोहळकर यांच्या माध्यमातूनही या गटनंबरमधील मुरूम बर्‍याच प्रमाणात उचलण्यात आला. सध्याच्या सरपंच त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य होत्या. सरपंचपदाची धुरा 13 ऑक्टोबर 2017 पासून त्यांच्याकडे आली. तेव्हापासून आजतागायत त्या कारभार सांभाळत असून त्यांच्यावर कसलाच आरोप करण्यास जागा नसल्याने विरोधक राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातील सुधारित बसस्थानकाचे मोठे काम त्यांच्या प्रयत्नातून होत असल्याने त्या परिसरात असणार्‍या अतिक्रमण धारकास अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने नोटिसा दिल्या आहेत.

अतिक्रमणे अतिक्रमानधारकांशी विरोधकांचे लागेबांधे व हितसंबंध असल्याने हे खोटे आरोप केले जात आहेत. त्याचप्रमाणे गटनंबर 866, 867 हा महाराष्ट्र शासनाच्या हक्काचा व त्यांच्या मालकीचा असून शासनाच्या मालकीच्या गटनंबर मधून मुरुमाची वाहतूक होत असताना किंवा करताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करणार्‍या मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल अथवा इतरांनी पंचनामा करून कारवाई केली असती. तशा स्वरूपाची लेखी समज नोटीस अथवा काही संबंधितांवर कारवाईचा आदेश पारित केला असता. असा कुठल्याही प्रकार झालेला नाही.

अशा प्रकारच्या खोट्या तक्रारीची तहसीलदारांनी पूर्ण शहानिशा करून न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपामुळे होणार्‍या बदनामीमुळे तसा खटला दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते डॉ सर्जेराव मोहळकर यांनी दिला आहे. या निवेदनावर सरपंच विद्या मोहळकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोहळकर, संजय मोहळकर, नाना भवाळ, कंपन मंलगणेर, सविता कोळपकर, लता किंबहुने, प्रभावती मोहळकर यांच्यासह गावातील 400 लोकांच्या सह्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!