Friday, April 26, 2024
Homeनगरपालिका विषय समित्यांच्या निवडी पुन्हा लांबणीवर

पालिका विषय समित्यांच्या निवडी पुन्हा लांबणीवर

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नगरपालिका गटनेतेपदाचा वाद हा न्यायप्रविष्ठ आहे. तसेच गटनेता निवडला गेला नसल्याने विषय समित्यांच्या निवडीची प्रक्रिया स्थगित करावी, असा आक्षेप विरोधी गटाचे माजी नगराध्यक्ष संजय फंड आणि नगरसेविका सौ. भारती कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नोंदवल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करत गटनेता नसल्याने कोणत्या गटात किती संख्याबळ आहे हेच, स्पष्ट होत नाही. तसेच हायकोर्टात गटनेतेपदाचा वाद प्रलंबित असल्याने निवडीची प्रक्रिया स्थगित करत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर नगर पालिकेच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपाच्या एकूण 23 नगरसेवकांनी एकत्र येऊन विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेबाबत प्रांताधिकार्‍यांकडे दोन पत्र दिले. एक पत्र नगरसेवक बाळासाहेब गांगड आणि दुसरे राजेंद्र पवार यांनी दिले. त्यात 10 आणि 15 नगरसेवकांच्या स्वाक्षर्‍या होत्या. बहुमताने विषय समित्यांची निवड करावी, अशी त्यांची मागणी होती.

- Advertisement -

त्याचवेळी संजय फंड आणि भारती कांबळे यांनी गटनेता नसल्याने आणि त्याचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने या निवडीवर आक्षेप घेतला. त्यानंतर प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून गटनेता नसल्याने कोणत्या गटाचे किती संख्या बळ हे स्पष्ट नाही, शिवाय गटनेतेपदाचा वाद हा न्यायप्रविष्ठ असल्याने सदर निवड प्रक्रिया स्थगित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा एकदा नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी झाल्या नाहीत.

श्रीरामपूर नगरपालिकेत सत्तांतर होऊन तीन वर्षे उलटून गेली तरीही विषय समित्यांच्या निवडी न झाल्याने विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. आता पुन्हा या समित्यांच्या निवडी लांबल्याने समित्याविना पालिकेचा कारभार यापुढेही चालू होणार हे स्पष्ट झाले आहे.

पालिका विषय समित्या निवडीचा डाव फसला

सभापतिपदाचे स्वप्न पहाणार्‍यांचे स्वप्न भंगले – ससाणे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपालिकेच्या विषय समित्या निवडीचा डाव फसला आहे. रात्रभर सभापतिपदाचे स्वप्न पहाणार्‍यांचे स्वप्न भंगले असल्याचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. येथील सुयोग मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवड ही निवडणूक नसून त्या नेमणुका आहेत. आणि सदरच्या नेमणुका करण्याबाबत गटनेत्याने पिठासीन अधिकार्‍यांना नाव सुचवायचे आहे.

त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या निर्णयाने ससाणे विरोधी आदिक व फुटीर गटाच्या नगरसेवकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले. सदरच्या निवडी गटनेत्याचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थगित केल्या आहे. यापुढील काळात महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडून विविध योजनेचा शहर विकासासाठी भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेसच्या नगरसेवकांनी यावेळी सांगितले.

नगरपालिकेमध्ये तालुक्याचे भाग्यविधाते स्व. जयंतराव ससाणे व काँग्रेस पक्षाच्या जीवावर जे 22 नगरसेवक निवडून आले. त्यापैकी काही फुटीर नगरसेवक स्वार्थासाठी व स्व-विकासासाठी वेगळी चूल मांडून शहराचा बट्ट्याबोळ करत आहेत. त्यास सत्ताधार्‍यांनी खतपाणी घातले असल्याचा आरोप करण ससाणे यांनी केला.

यावेळी नगरसेवक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेवक मुजफ्फर शेख, बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, नगरसेवक दिलीप नागरे, मनोज लबडे, नगरसेविका सौ. भारती कांबळे, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, मुळा-प्रवराचे संचालक संजय छल्लारे, मुन्ना पठाण, नगरसेविका आशाताई रासकर, सौ. भारती परदेशी, सौ. मिराताई रोटे, सौ. दीपाली ससाणे आदी उपस्थित होते.

विकास कामे न होऊ देण्याचा विरोधकांचा डाव

नगरसेवक गांगड व पवार यांचा आरोप

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – गेल्या तीन वर्षापासून शहरात विकासकामे व्हावीत म्हणून नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व सर्व सहकारी नगरसेवक प्रयत्नशील आहेत, मात्र शहरात विकास कामे होऊ नयेत, विषय समित्यांच्या निवडी होऊ नयेत हा रडीचा डाव विरोधक खेळत असल्याचा आरोप नगरसेवक बाळासाहेब गांगड व राजेंद्र पवार यांनी केला आहे.

शहरात विकास न झाल्यास आम्हाला सत्ता मिळेल हा डाव विरोधकांचा आहे. आमच्यावर कामे करत नसल्याचा आरोप करणार्‍यांचा खरा चेहरा जनतेपुढे उघड झाला आहे. राज्याच्या सत्तेत विखे-थोरातांपैकी जे नेते असतात त्यांचा वापर स्वार्थासाठी करण्याचा विरोधकांचा उद्योग 25 वर्षांपासून जनता बघत आहे. शहराचा विकास, विषय समित्या यापेक्षा राजकीय द्वेष अंगात भरलेल्या विरोधकांच्या स्वार्थीवृत्तीमुळे एक नव्हे 15 नगरसेवक सोडून गेले. सत्तेची ऊब घेण्यासाठी मेगाभरतीला गेलेल्यांना विधानसभेआधी कोणी दारात उभे केले नाही.

नगराध्यक्षा व सर्व सहकारी शहरातील जनतेला बांधील आहोत, मात्र विरोधकांना सत्तेची चटक लागलेली असल्याने त्यांना स्वविकासासाठी पालिकेची सत्ता हवी आहे. त्यांच्याकडे बहुमत नाही, विकासाचा अजेंडा नाही, दररोज सहकारी सोडून जात असल्याने हतबल झालेल्या विरोधकांनी हा रडीचा डाव खेळला. मागील तीन वर्षांपासून विषय समित्या मी होऊ देत नसल्याचे आरोप विरोधकांनी केले.

विषय समित्या होऊ नये म्हणून अर्ज देणारे विरोधकच शहराच्या अधोगतीसाठी जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट झाले आहे.
25 वर्षांपासून सत्तेच्या मोहात अडकलेल्या विरोधकांमुळे जनतेचे मोठे नुकसान होत असून सर्वानुमते विषय समित्या व्हाव्यात अशी आमची सर्वांची इच्छा असून कायदेशीर बाबींचा अभ्यास करून या प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे गांगड व पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या