Sunday, May 5, 2024
Homeनगरमुळा धरणातून डाव्या कालव्याला दुसरे उन्हाळी आवर्तन

मुळा धरणातून डाव्या कालव्याला दुसरे उन्हाळी आवर्तन

22 दिवसांच्या आवर्तनातून साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

राहुरी (प्रतिनिधी)- शेवटच्या चरणात रब्बी हंगामातील पिके पाण्यावर आल्याने मुळा धरणातून वांबोरी चारीपाठोपाठ डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता लाभक्षेत्रातील पिकांना दिलासा मिळणार असून हे आवर्तन 22 दिवस सुरू राहणार आहे. या आवर्तनातून लाभक्षेत्रातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

- Advertisement -

मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता 26 हजार दशलक्ष घनफूट असून सध्या मुळा धरणात 14 हजार 700 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मुळा डाव्या कालव्यासाठी सोडण्यात आलेले हे उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन आहे. काल धरणातून 200 क्युसेकने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. काल सायंकाळी सहा वाजता हे आवर्तन 100 क्युसेकने वाढविण्यात येऊन ते 300 क्युसेक करण्यात येणार आहे, अशी माहिती कालवा कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राखाली एक हजार सातशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा राखीव आहे. मागील आवर्तनाच्यावेळी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला 500 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला. उन्हाळ्यात डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली होती. या उन्हाळी आवर्तनाच्या माध्यमातून 500 दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या