Monday, April 29, 2024
Homeनगर‘मुळा-प्रवरा’च्या अन्नछत्रावर सोशल वार

‘मुळा-प्रवरा’च्या अन्नछत्रावर सोशल वार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘अन्नछत्रा’ वर सोशल मीडियावर विविध स्तरातून टीका सुरू झाली आहे. विरोधकांकडून सुरु झालेली ही टीका ‘मुळा-प्रवरा’च्या कार्यक्षेत्रात एक चर्चेचा विषय झाला आहे.

लॉकडाऊनच्या काळात श्रीरामपूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला एक आधार म्हणून राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे अध्यक्ष खा. डॉ. सुजय विखे पाटील व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या पुढाकारातून संस्थेच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यात गोंधवणी, बेलापूर, टाकळीभान तसेच राहुरी तालुक्यात अन्नछत्र सुरू करण्यात आले. या अन्नछत्राच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण देण्यात येते.

- Advertisement -

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार भानुदास मुरकुटे हे एकेकाळचे कट्टर विरोधक म्हणून मतदार त्यांच्याकडे पाहतात. परंतु आज हे दोन्ही मोठे नेते एकमेकांच्या हातात हात घेऊन अन्नछात्रांची उद्घाटने करत आहेत. मात्र त्यांच्या या ‘अन्नछत्रा’वर सोशल मीडियाच्या माध्यमातून जहरी टीका सुरु झाली आहे.

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सुरेश ताके यांनी फेसबुकवर या अन्नछत्रास श्रीरामपूर तालुक्यातील राजकारणाच नाटक… असे म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, मुळा-प्रवरा संस्थेत काल झालेला कार्यक्रम व त्यात आलेला फोटो बघितल्यानंतर तालुक्यात गेली 30-40 वर्ष नाटकी राजकारण डोळ्यासमोर तरळून गेले. अगदी हास्यास्पद फोटो… ज्या मजुराला ज्येष्ठ नेते घास भरवतात, ती व्यक्ती कुणी मजूर नसून उंदिरगाव सारख्या मोठ्या गावचा माजी सरपंच आहे. उंदिरगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक आहेत. अशोकचे सभासद आहेत. त्यांचा मुलगा अशोक साखर कारखान्यात नोकरीला असून मोठा मुलगा उंदिरगावातील चांगला व्यवसायिक आहे.

अशा प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिकाला मजूर बनवून त्याला घास भरवताना फोटो काढून या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रसिध्द करून स्वतः चे या इतक्या नाटकी देखावा करण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे सामाजिक उथळपणाच आहे. अशी नाटके करूनच हे नेते तग धरून आहेत असे श्री .ताके यांनी म्हटले आहे.

तर माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर, हे अन्नछत्र म्हणजे ‘सभासदांची कढी धाऊ धाऊ वाढी’ असा प्रकार आहे. ज्यांनी मुळा-प्रवरा वीज संस्थेसारखी संस्था बंद पाडली, कामगारांच्या संसाराचे वाटोळे केले, गोरगरिबांचे वाटोळे केले. आता तेच या संस्थेच्या माध्यमातून अन्नदान करायला निघाले आहेत. अन्नदान करायचे तर स्वतःच्या घरातील संस्थातून करा? असा सल्लाही त्यांनी ज्येष्ठ नेत्यांना दिला आहे. राज्यात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अशावेळी मुळा-प्रवराच्या पैशातून करोना मदतीसाठी पंतप्रधान फंडाला 25 लाख रुपये दिले ते मुख्यमंत्री निधीला दिले असते तर त्यांचा उपयोग राज्याला अधिक झाला असता असे मतही ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी व्यक्त केले आहे.

करोना काळात गोरगरिबांंना मदत करताना फोटो काढू नये व ते प्रसिध्द अथवा सोशल मिडीयावर पसरवू नये या पंतप्रधानांच्य सूचनेला हरताळ फासली असल्याची टीका राजेंद्र पाऊलबुध्दे यांनी केली आहे. तर राजेंद्र आसने यांनी व्हॉटअ‍ॅपवर राजकारण्यांनी घास भरविल्याच्या फोटोचा संदर्भात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला तर सर्व सामान्य जनतेने शिकायचे कोणाकडून? असा सवाल केला आहे. तर गणेश छल्लारे यांनी ‘सभासदांची कढी अन् धाऊ-धाऊ वाढी’ अशी टिप्पणी केली आहे.
या प्रातिनिधीक स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी काल दिवसभर अनेक ग्रुपवर ही चर्चा चांगलीच रंगली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या