Wednesday, April 24, 2024
Homeनगरमुकुंदनगरचे रस्ते पत्रे ठोकून केले बंद

मुकुंदनगरचे रस्ते पत्रे ठोकून केले बंद

तटबंदी आणखी घट्ट : सेवा पुरविण्याबाबतच्या तक्रारीत वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी)- हॉटस्पॉटमुळे एकीकडे वैतागलेल्या मुकुंदनगरभोवती प्रशासनाने आज आणखी घट्ट तटबंदी केली. एक प्रमुख मार्ग सोडला तर सर्व रस्ते पत्रे ठोकून बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे मुकुंदनगरकरांच्या सेवेसाठी असलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍यांवर आणि ते पुरवत असलेल्या सेवेवरील नाराजी अद्यापही कायम आहे.

- Advertisement -

मुकुंदनगर परिसरात कोरोनाची लागण झालेले परदेशी नागरिक राहिले होते. तसेच तेथील काहींना याची लागण झाली. आलमगीर येथीलही काहींना कोरोनाची लागण झाली. यामुळे जिल्हा प्रशासनाने हे दोन्ही परिसर हॉटस्पॉट जाहीर करून तेथे अत्यावश्यक सेवेसह सर्व बंद केले. एवढेच नव्हे, तर कोणीही बाहेर पडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मुकुंदनगर परिसरातील कोणी आणि बाहेरचे कोणी आत बाहेर करणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे.

असे असतानाही काही ना काही कारणास्तव आतबाहेर चालू असल्याचे आढळून आले. येथील नागरिक इतर कोणत्या परिसरात जाऊ नये, तेथे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन जास्तीत जास्त काळजी घेत आहे. तसेच तेथे रहात असलेल पण कोरोनाची लागण न झालेल्यांनाही याची लागण होऊ नये, यासाठी प्रशासनाची धडपड आहे. त्यामुळे आणखी कठोर भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुकुंदनगरकडे जाणारे गोविंदपुरा आणि महापालिकेसमोरील रस्ता पत्रे ठोकून बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे आता या भागातील नागरिक बाहेर आणि बाहेरचे आत जाणे अशक्य तर आहेच, शिवाय आतील बंदोबस्तही कडक असल्याने घराबाहेर पडणे अशक्य आहे. येथील हॉटस्पॉटची मुदत 23 मे पर्यंत आहे. 24 तारखेपासून मुस्लिमांचा पवित्र असा रमझान महिना सुरू होत आहे. त्यापूर्वी येथील बंधने हटविता येतील का, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. मात्र यासाठी तेथील नागरिकांचे सहकार्य प्रशासनाला हवे आहेत.

प्रशासनाने येथील अत्यावश्यक सेवा बंद केल्या असल्या, तरी त्या पुरविण्याचीही सुविधा निर्माण करून दिली आहे. महापालिकेने यासाठी जवळपास 90 पेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त केले असून, कंट्रोल कक्ष स्थापन केला आहे. ज्यांना जी वस्तू हवी, त्याची नोंदणी या कक्षात दुरध्वनीद्वारे केल्यानंतर ती सशुल्क पुरविली जाते. मात्र ही सेवा व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

सेवा देताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी कर्मचार्‍यांच्या आहेत. सेवा व्यवस्थित मिळत नसल्यामुळे थेट मंत्र्यांपर्यंत तक्रारी करण्यात येत असल्याने त्यातूनही महापालिकेवर दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे महापालिकेने आता वस्तूचा साठा असलेली वाहने या भागात पाठविण्यास सुरवात केली आहे. ज्यांना जेवढ्या वस्तू हव्यात, तेवढ्या त्यांनी पैसे देऊन घ्याव्यात, असा त्यामागे हेतू आहे. यात राजकीय हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या