मुकुंदनगरमध्ये हॉटस्पॉट शिथील; अंतर्गत रस्ते मात्र बंदच

jalgaon-digital
3 Min Read

जीवनावश्यक वस्तुंची दुकाने चौदा दिवसानंतर खुली

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगरकरांनी आज अखेर सुटकेचा निश्वास सोडला. हॉटस्पॉट शिथिल केल्याने अनेक दिवसानंतर घराबाहेर येण्यासाठी आतुरलेल्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

निजामुद्दीनला मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक मुकुंदनगरमध्ये एक दिवस वास्तव्यास होते. ते करोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. त्यामुळे मुकुंदनगर परिसरावर प्रशासनाचे लक्ष होते. त्यातच एक रूग्ण या भागातील सापडल्याने मुकुंदनगरसह भिंगार येथील आलमगीर, जामखेड आणि संगमनेर येथील एक भाग हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आला होता. नगर शहरातील मुकुंदनगरचा भाग पूर्णपणे सील केल्यामुळे शहरातच खळबळ उडाली होती. मुकुंदनगरमधील नागरिकांचे शहरात अन्य कोणाशी संपर्क आला का, याचीच चर्चा गेले काही दिवस नगरमध्ये होती.

मुकुंदनगरमध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकानेही बंद करण्यात आली होती. तेथील नागरिकांना या सेवा पुरविण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित होती. त्यासाठी कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली होती. मात्र ही सेवा व्यवस्थित मिळत नाही, इथपासून अनेक तक्रारींचा पाऊस रोज पडत होता. या तक्रारी स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता सरकारमधील लोकांपर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे प्रशासनालाही याची सातत्याने विचारणा होत होती.

हॉटस्पॉटचा कालावधी वाढू नये, यासाठीही जोरदार प्रयत्न होत होते. बुधवारी (दि. 22) जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संदर्भात एक निवेदन केले होते. त्यात मुकुंदनगरमध्ये या दोन दिवसात करोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला नाही, तर हॉटस्पॉटची बंधने शिथिल करण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे रूग्ण आढळू नये म्हणून अनेकांनी प्रार्थना सुरू केली होती.

मुकुंदनगर येथील हॉटस्पॉट शिथील केल्याचा आदेश काढला नसला, तरी गुरूवारी रात्री उशीरा मुकुंदनगर परिसरात ध्वनिक्षेपकावरून याची माहिती देण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने नगर शहरात ज्या वेळेला चालू असतात, त्याच वेळेला मुकुंदनगरमध्ये शुक्रवारपासून सुरू राहतील, मात्र नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी ही दुकाने उघडल्यानंतर मुकुंदनगरकरांनी फटाके वाजविल्याचे सांगण्यात येते.

ही बंधने उठली असली, तरी मुकुंदनगरकरांना अद्याप त्यांच्या परिसरातून बाहेर पडण्यास मुभा नाही. या परिसरातील दुकानदारांना माल आणण्यासाठी बाहेर पडण्यास परवानगी असली, तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्या बाबत बंधन आहेत. एवढेच नव्हे, तर या परिसरातही घराबाहेर जास्तकाळ रेंगाळण्यासाठी मुभा नाही. येथील अंतर्गत रस्ते अद्यापही बंद असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनातच आहे. वैद्यकीय कारणासाठी कोणाला परिसराबाहेर जाणे अत्यावश्यक असल्यास त्यासाठी तेथे रूग्णवाहिका सज्ज ठेवलेल्या आहेत.

महापालिकेलाही सुटकेचा आनंद

  • मुकुंदनगरमध्ये जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याचे काम महापालिकेकडे होते. त्यासाठी सुमारे शंभर कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मुकुंदनगरकरांच्या या सेवेबाबत असलेल्या तक्रारींमुळे आणि त्या बाबत सरकारपातळीवरून होणार्‍या विचारणेमुळे अधिकारी आणि कर्मचारी उत्तरे देऊन वैतागले होते. या जबाबदारीतून मुक्तता झाल्याचा आनंद महापालिका कर्मचार्‍यांमध्येही आज दिसून आला.
  • हॉटस्पॉट शिथील करण्यात आले व रमजानलाही प्रारंभ झाल्यामुळे येथील नागरिकांनी आपआपल्या घरात नमाज अदा करुन प्रार्थना केली. अनेक दिवसानंतर घराबाहेर येण्यासाठी आतुरलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *