Saturday, April 27, 2024
Homeनगरकेंद्राकडून ‘जीएसटी’चे 15 हजार कोटी न मिळाल्याने राज्यापुढे आर्थिक संकट

केंद्राकडून ‘जीएसटी’चे 15 हजार कोटी न मिळाल्याने राज्यापुढे आर्थिक संकट

खासदार सुप्रिया सुळे : विकासकामांतून सरकार 15 वर्षे चालणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारकडून राज्याला जीएसटी करापोटी सुमारे 15 हजार कोटी रुपये येणे असल्याने राज्यातील विकासाच्या सर्व योजनांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प मांडताना मोठी कसरत करावी लागणार आहे. असे असले तरी त्यातून मार्ग निघेल. विकासाच्या माध्यमातून हे सरकार पाचच काय पंधरा वर्षे काम करेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने आयोजित शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच पद्मश्री राहीबाई पोपेरे, पद्मश्री पोपट पवार, झहीर खान यांच्यासह शहरातील सामाजिक काम करणार्‍या व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, झहीर खानचे वडील बख्तीयार खान, आई झाकिया खान, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, निर्मला मालपाणी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदिप वर्पे, कपिल पवार, फा.ज्यो. गायकवाड आदी उपस्थित होते.

खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आम्ही येत्या पाच वर्षात राज्याचा खालावलेला लौकिक व आण बाण शान परत मिळवून देणार आहोत. आम्ही द्वेषाचे राजकारण करणार नाही तर विकास करणार आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर खुशाल टीका करावी. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सत्ताकाळात नोकर भरती करण्याऐवजी पक्ष भरती केली. त्यामुळे अनेक युवक बेरोजगार राहिले, असा आरोपही त्यांनी केला.

खा. शरद पवार यांनी महिलांना आरक्षण दिले त्यामुळे महिला उंबरठा ओलांडून बाहेर आल्या आहेत. स्व. आर. आर. आबांनी राज्यात स्वच्छता अभियान सुरु केले. तीच योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारली आहे. भाजपाच्या मुख्यमत्र्यांनी राज्याची आर्थिक अधोगती करून ठेवली आहे. राज्याचा नंबर खाली घसरला. त्यामुळे आता आमच्यापुढे राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान आहे.

मात्र आम्ही द्वेषाचे राजकारण न करता विकासाचे समाजकारण करणार आहोत. नोकर भरती करुन युवकांच्या हाताला काम देणार आहोत. मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त पक्ष भरती केली. दिल्लीतील केजरीवाल सरकारने विकास केला म्हणून लोकांनी त्यांना पुन्हा संधी दिली. जनतेला जात-पात-धर्म यात अजिबात रस नाही तर विकास हवा आहे, हे दिल्लीच्या निवडणुकीने दाखवून दिले. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत योग्य धोरण तयार करून निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यावेळी म्हणाल्या, रासायनिक खते टाकून काळ्या मातीचे आरोग्य बिघडविले जात आहे. तिचे आरोग्य बिघडले तर डॉक्टर कुठून शोधणार मी निसर्गाच्या शाळेत शिकले, काळ्या मातीशी नाते जोडले त्यामुळे माझा पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाला. रासायनिक शेती करणारा शेतकरी कर्जबाजारी होतोय व नंतर आत्महत्या करतो. या आत्महत्या थांबवायच्या असतील तर जुनं शोधा व पारंपारिक शेती वाढवा, त्याचा भरपूर प्रसार करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, मानसिक आरोग्या बरोबरच शारीरिक आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छ पाणी व शुध्द मातीसाठी काम करण्याची गरज आहे.

प्रारंभी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी स्वागतपर भाषणात खासदार दत्तक गाव योजनेच्या धर्तीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीरामपूर शहर दत्तक घेऊन शहराच्या विकासासाठी मदतीची मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक म्हणाले, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या बीजमाता राहीबाई पोपेरे, आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार व भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांनी आपापल्या क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे. त्यामुळे सरकारने या कामाची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पदवी बहाल केली आहे. त्यांचे कार्य सर्वांना स्फूर्ती देणारे आहे.

प्रास्ताविक नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मिनाताई जगधने, नगरसेवक आप्पा गांगड, अ‍ॅड. संतोष कांबळे, ताराचंद रणदिवे, सौ. शितल गवारे, अक्सा पटेल, हेमा गुलाटी, प्रणिती चव्हाण, वैशाली चव्हाण, दिपक चव्हाण, रवि पाटील, स्नेहल खोरे आदींसह सर्व नगरसेवक तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे संतोष मते यांनी तर आभार नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले.

सरकारमध्ये नगरचे मोठे योगदान
आताच्या सरकारमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे मोठे योगदान दिले आहे. सर्व युवा आमदार जिल्ह्याने दिले. श्रीरामपूर मतदारसंघ हा काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीचे नेते इकडे येत नाहीत ही गोष्ट खरी आहे. मात्र यापुढे असे होणार नाही.

तृतीयपंथियांसाठी नवी योजना
तृतीयपंथियांसाठी समाज कल्याणमंत्री धनंजय मुंढे लवकरच चांगली योजना आणत आहेत. पुरुष,स्त्री व त्यांच्यासाठी आता जो इतर रकाना भरावा लागतो तो आम्ही रद्द करून त्यांना ज्या घटकात नोंद हवी आहे त्यात नोंद करणारे महाराष्ट्र हे देशात छत्तीसगड नंतर दुसरे राज्य ठरणार आहे, असेही खा. सुळे यांनी यावेळी सांगितले.

नगराध्यक्षांचे कौतुक
श्रीरामपूर नगरपालिकेत नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक अतिशय चांगले काम करत आहे. त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी असलेला थेट संपर्क या सत्कार सोहळ्यातून दिसून आला. त्यांच्या बोलण्यातील गोडवा पाहून आमच्याकडील नगराध्यक्षांना त्यांच्याकडे शिकण्यासाठी पाठवावे लागेल, अशा शब्दात खा. सुप्रिया सुळे यांनी नगराध्या आदिक यांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या