Saturday, April 27, 2024
Homeनगरआमदारांनी सुचविलेली कामे करण्याची झेडपीवर वेळ

आमदारांनी सुचविलेली कामे करण्याची झेडपीवर वेळ

आमदार तुपाशी- जिल्हा परिषद सदस्य उपाशी : 323 कामांसाठी 36 कोटींचा निधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी (आमदारांनी) सूचविलेल्या कामांसाठी 36 कोटी 35 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. त्यातून 323 रस्त्यांची कामे होणार आहे. या कामांना जिल्हा परिषदेने प्रशासकीय मंजुरी दिलेली असून आता आमदारांनी सुचविलेली कामे जिल्हा परिषद करणार आहे. हा प्रकार म्हणजे आमदार तुपाशी आणि जिल्हा परिषद सदस्य उपाशी असाचा झाला आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कामे सूचविली होती. या योजनेच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर या कामांना जिल्हा परिषदेतर्फे प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, संगमनेर, पारनेर, अकोले, नेवासा, पाथर्डी आणि राहुरी तालुक्यातील सुमारे 338 रस्त्यांची कामे होणार आहेत. यामध्ये रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण आदी कामे होणार आहेत.

यंदा करोनामुळे जिल्हा परिषदेची आर्थिक स्थिती वाईट आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, यासह सभापती यांच्यासह सदस्यांच्या वाट्याला ग्रामीण भागात विकासासाठी निधीच मिळणार नाही. काही प्रमाणात गेल्या वर्षीच्या निधीवर सदस्यांना समाधान मानावे लागणार आहे. त्यात आता जिल्ह्यातील आमदारांनी सुचविलेली कामे जिल्हा परिषद करणार असल्याने आपल्या डोळ्यात देखत कोट्यवधी रुपयांची कामे होणार असल्याने सदस्यांच्या जीवाची घालमेल होणार आहे. सर्व काही दिसत आणि समजत असून सदस्य हतबल होऊन काही करू शकणार नाहीत.

दरम्यान, काही सदस्यांनी आमदारांनी त्यांच्या वाट्याला येणार्‍या निधीतून प्रत्येक सदस्यांना कामे द्यावीत, आजही जिल्हा परिषद सदस्यांकडे ग्रामीण भागातील नागरिक समस्या घेऊन येत असून त्या कशा सोडवाव्यात असा प्रश्न सदस्यांसमोर आहे.

हा निधी करोना प्रतिबंधासाठी द्या : वाकचौरे
आमदारांनी सूचविलेल्या कामांना जिल्हा परिषदेने प्रशासकीय मंजुरी न देता तो निधी करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली होती. त्यात आता जिल्हा परिषदेने या कामांना मंजुरी दिल्यामुळे आता सदस्य काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुकानिहाय कामे
कर्जत 136, जामखेड 55, पारनेर 55, नगर 10, राहुरी 15, संगमनेर 20, नेवासा 25 आणि अकोले 7 या कामांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या