Wednesday, April 24, 2024
Homeनगरजन्मस्थळ वाद : शिर्डीकरांच्या भावनेशी सहमत – आ. विखे

जन्मस्थळ वाद : शिर्डीकरांच्या भावनेशी सहमत – आ. विखे

शिर्डी (शहर प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांच्या जन्मस्थळ पाथरीला निधी उपलब्ध करून देण्यास शिर्डी ग्रामस्थांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांनी हे विधान मागे घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करून कोट्यवधी साईभक्तांच्या भावनेचा आदर करावा. तसेच या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शिर्डीकरांच्या भावनेशी सहमत असून शिर्डी बंदला माझा पाठिंबा असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

साईजन्मभूमी वादासंदर्भात तालुक्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन शिर्डीकरांची भूमिका जाणून घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक हरिचंद्र कोते, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, विलास आबा कोते, रवींद्र गोंदकर, मधुकर कोते, अशोक पवार, गणेश दिनुमामा कोते, विकास गोंदकर, सचिन शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी आ. विखे पाटील म्हणाले, साईबाबांच्या जन्मस्थळावरून आतापर्यंत आठ ते दहा वेळेस प्रश्न उपस्थित करून लाखो साईभक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न का झाला? कशासाठी झाला? व कोणी केला हे आपल्याला समजत नाही. शिर्डीची आध्यात्मिक अखंडता व परंपरा मोडीत काढण्याचा काही मंडळी प्रयत्न करतात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जन्मस्थळाच्या वादाबाबत पूर्ण माहिती घेऊन विधान केले असते तर या वादाची परिस्थिती उद्भवली नसती. साईसमाधीचे शताब्दी वर्ष पूर्ण झाले, त्यावेळी साईबाबांच्या जन्मस्थळाचे पुरावे देता आले नसल्याचे आमदार विखे पाटील यांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या समितीद्वारे निवाडा व्हावा : ना. गोर्‍हे
शिर्डी साईबाबा जन्मस्थानांचा मुद्दा खूप वषार्र्ंपासून प्रलंबित आहे. साईबाबांनी त्यांचे आयुष्य हे लोक कल्याणासाठी वाहिले होते. जन्मस्थानाच्या मुद्द्यावरून भाविकांत गैरसमज पसरत आहेत. जन्मस्थान हा भाविकांच्या आस्थेचा विषय असला तरी त्यात बर्‍याच गोष्टी पुरात्तत्व विभागाशी सलंग्न आहेत. यात शिर्डी आणि पाथरी येथील भाविकांचे आणि ग्रामस्थांशी बैठक घेऊन दोन्ही ठिकाणचा विकास होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. तसेच माजी न्यायमूर्ती आणि पुरातत्व विभागाचे तज्ज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या समितीस तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येऊन साईबाबांच्या जन्मस्थानाच्या निवाडा करण्यात यावा, अशी सूचना ना. डॉ. निलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. दरम्यान शिर्डी बंद मागे घेण्याचे आवाहन करण्यात यावे आणि तत्काळ शिर्डी येथील ग्रामस्थ यांची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांनी शिर्डी आणि पाथरी येथील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन देऊन शिर्डी ग्रामस्थांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले.

बंद काळात साई मंदिर नियमित सुरू राहणार

शिर्डी (प्रतिनिधी) – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, मंदिरातील सर्व आरत्या व सर्व धार्मिक विधी या नियमित प्रमाणे रविवार दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी व त्यानंतरही सुरू राहणार असून संस्थानचे श्री साईप्रसादालय, सर्व भक्तनिवासस्थाने, रुग्णालये आदी सुविधा ही नियमित प्रमाणेच सुरू राहतील, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या