Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शेतकर्‍यांपेक्षा सरकारला नाईट लाईफची चिंता अधिक- आ. विखे

Share
शेतकर्‍यांपेक्षा सरकारला नाईट लाईफची चिंता अधिक- आ. विखे, Latest News Mla Vikhe Statement Shirdi

शिर्डी (प्रतिनिधी) – राज्यातील जनतेला दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढविण्याचाच सरकारचा प्रयत्न दिसतो. कोणत्याही आश्वासनाची पूर्तता नाही. ‘तीन तिघाडी आणि काम बिघाडी’ अशी सरकारची अवस्था झाली आहे. मागील सरकारच्या योजना बंद करण्यावर सरकारचा भर असून, शेतकर्‍यांपेक्षा सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक असल्याची खोचक टीका माजी मंत्री आ .राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

आ.विखे पाटील म्हणाले की, सरकार नविन असल्याने त्यांना निर्णय घेण्यासाठी आमच्या शुभेच्छा कायम आहेत. पण मूळ विषयाला बगल देण्याचे काम सरकारने थांबविले पाहिजे. अतिवृष्टीचे 25 हजार रुपये शेतकर्‍यांना देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करून, सातबारा कोरा करण्याचा शब्दही हे सरकार विसरले आहे. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्यानेच राज्यात पुन्हा शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याकडे आ.विखे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून सरकारने लोकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. पण या सरकारकडून जनतेची अडवणूकच सुरू असून मुख्यमंत्र्याचा रिमोट कोण चालवतय यापेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर केलेल्या आंदोलनाबाबत बोलताना विखे यांनी सांगितले की, मागील सरकारच्या योजना बंद करून या सरकारला पुढे जाता येणार नाही. गोदावरीचे खोरे हे तुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या भागातील पाणी प्रश्नासाठी कायमच संघर्ष झाला. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी याबाबत सातत्याने भूमिका मांडली, पण विखे पाटलांना पाणी प्रश्नाचे श्रेय मिळेल म्हणून जे विरोध करत होते.

तेच आता या प्रश्नावर एका सुरात बोलू लागले आहेत. गोदावरी खोर्‍यातील पाण्याची तूट भरून काढली तर नगर, नाशिकसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असे सूचित करून विखे म्हणाले की, पाणी प्रश्नावरून प्रादेशिक वाद निर्माण करण्यापेक्षा सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून मागील सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड आणि पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या खोर्‍यात वळविण्याच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!