Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मी निवडलेला मार्ग योग्यच

Share
मी निवडलेला मार्ग योग्यच, latest news mla vikhe statement shirdi

श्रीरामपुरातील फलकावरील वाक्यावर माजीमंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण

शिर्डी (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी जो रस्ता स्विकारलेला आहे तो योग्यच आहे व मी समाधानी असून आता रस्ता बदलण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

श्री. विखे पाटील यांच्या श्रीरामपुरातील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास पक्षविरहित स्वरूप होते. त्यातच तेथील एका फ्लेक्सवर ‘चलो एक पहल की जाए…नए रस्ते की ओर…’ असे एक वाक्य लिहिलेले होते. याचा नेमका अर्थ काय घ्यावा, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना आ. विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी जो रस्ता स्विकारलेला आहे तो योग्यच आहे व मी समाधानी असून आता रस्ता बदलण्याची गरज नाही.

श्रीरामपूर येथील कार्यालय हे सर्वपक्षिय कार्यकर्त्यांच्या संपर्कासाठी आहे. ज्या फलकावरुन चर्चा सुरु आहे त्यावरील वाक्य हे श्रीरामपूरची होत असलेली आधोगती संदर्भात आहे. भविष्यात या तालुक्यालाच आम्हाला वेगळ्या दिशेने घेऊन जायचे असल्याने तो निश्चय या वाक्यातून आम्ही व्यक्त केल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.

एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यावरुन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेल्या भितीबाबत आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना आ.विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा अभिनंदनीय आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेता असताना हीच भूमिका आपण सभागृहात मांडली होती. मात्र आज वेगवेगळी मतं मांडणार्‍या लोकांना या विषयाचा पान्हा फुटला आहे, यापुर्वी या विषयाबाबत हीच मंडळी गप्प बसली होती याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

एनआयएच्या निर्णयाबाबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात व्यक्त करत असलेली प्रतिक्रीया हे त्यांचे स्वतःचे मत नाही. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर राहणे हे सुत्र साधारणपणे स्विकारायचे असते. पण थोरातांना हा विषयच समजलेला नाही. आंबेडकरवादी चळवळीचा संदर्भ या विषयाशी नाही.

कोणाच्या तरी सांगण्यावरुन त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे दुसर्‍याच्या हातातील बाहुलं बनून भूमिका मांडण्याचा केलेला त्यांचा प्रयत्न महाराष्ट्र पाहतोय. आज मुख्यमंत्र्यांचा सरकारवर कंट्रोल राहिलेला नाही. शिवसेना आणि काँग्रेसचा रिमोट कंट्रोलही दुसर्‍याच्याच हातात गेल्याने ते सांगतील तशीच मतं आता मांडण्याचा सपाटा सुरु असल्याचे ते म्हणाले.

इंदोरीकरांना संयम असायला हवा
इंदोरीकर महाराजांबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांचे प्रबोधनाचे काम खूप मोठे आहे. परंतु प्रबोधन करतानाही थोडासा संयम असायला हवा असा सल्ला माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देऊन आता देवच त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी टिप्पणी केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!